भरसमुद्रात परप्रांतियांचा मच्छिमारांवर हल्ला

कोळी बांधव आक्रमक; भैय्या हटावचा नारा मुरुड येथील घटना

By Raigad Times    06-Feb-2024
Total Views |
murud
 
मुरड । खोल समुद्रात बेकायेदशीररित्या एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्‍या काही भैय्यानी स्थानिक मच्छिमारांना मारहाण केली.या घटनेनंतर कोळीबांधव आक्रमक झाले आहेत. ‘भैय्या हटाव, एलईडी हटाव’चा नारा देत आमच्या कुंकवाचं रक्षण करा, अशी मागणी कोळी महिलांकडून करण्यात आली आहे.
 
तसेच मारहाण करणार्‍या भैय्यानाअटक अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.मुरुड येथील माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छिमार सहकारी संस्थेची यंत्रचलित नौका कस्तुरीचे बोट मालक धुर्वा गोपाळ लोदी,खलाशी सुरेश पांडुरंग आगरकर व त्यांचे सहकारी असे 12 जण खोल समुद्रात मासेमारी करत होते.
 
यावेळी अलिबाग मधील साखरआक्षी येथील खंडोबा प्रसन्न व नवदुर्गा अशा आठ नौका बेकायदेशीररित्या एलईडी लावून मासेमारी करत होते.नौकांमध्ये असणार्‍या परप्रांतियांनी आपल्या आठ नौकांना जवळ करुन कस्तुरी नौकेमध्ये घुसले आणि त्यांनी चौदा खलाशांना जोरदार मारहाण केली.
 
नौकांची नासधूस केली.तसेच बोटीतील डिझेल व मासेमारीचे सामान घेऊन पलायन केले. कस्तुरी बोट मालक धुर्वा लोदी व सुरेश आगरकर यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने बोटीमधील खलाशांनी बोट समुद्रालगत आणून दोघांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
 
ही बातमी कळताच कोळी बांधव व महिलांनी शेकडोंच्या संख्येने मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली; परंतु जमावबंदी असल्याने कोटेश्वरी मंदिराजवळ येऊन एलईडी हटाव, भैयाहटाव यांचे फलक दाखवून संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, आमच्या कुंकवाचं रक्षण करा, नाहीतर सर्वात मोठे आंदोलन करु, अशी मागणी महिला कोळी बांधवांनी केली.याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी घटनास्थळी येऊन आपली तक्रार घेतली असून, कायदेशीर कारवाई करु, असे आश्वासन दिले.
 
यावेळी मुरुड पोलीस ठाण्यात मच्छिमार सोसायटीच्या शिष्टमंडळाने संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.यावेळी महालक्ष्मी मच्छिमार सोसायटी राजपुरीचे चेअरमन विजय गिदी, हनुमान जो प्रकार घडला, तो निंदनीय आहे.आरोपींना अटक झालीच पाहिजे नाहीतर आम्ही मोठे आंदोलन करु.
 
आमचे गरीब कोळी बांधवशासनाच्या नियमानुसार मासेमारी करतात. परंतु,बेकायदेशीरपणे एलईडी लावून जे मासेमारी करतात, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. शासन आपल्या दारी की एलईडीच्या दारी, असा प्रश्न पडला आहे. तरी, कोळी बांधवांना न्याय द्यावा.- पांडुरंग आगरकर, चेअरमन,हनुमान मच्छिमार सोसायटी एकदरा
कोळी बांधवांनी शांतता राखावी, आपली तक्रार घेतली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करु. - निशा जाधव,पोलीस निरीक्षक, मुरुड
मच्छिमार सोसायटी एकदराचे चेअरमन पांडुरंग आगरकर, माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित चेअरमन जगन वाघरे,जय भवानी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन प्रकाश सरपाटील आदींसह शेकडो महिला व कोळी बांधव उपस्थित होते.