रायगड लोकसभेच्या जागेसाठी भाजप ठाम

पेण कार्यकर्त्याकडून लोकसभेसाठी धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा

By Raigad Times    05-Feb-2024
Total Views |
pen
 
पेण । भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे रायगड लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी असा दावा पुन्हा एकदा भाजपच्या जिल्हापातळीवरील नेत्यांकडून करण्यात आला आहे. विद्यमान आमदार सुनिल तटकरे यांना निवडूण आणणारे तेव्हाचे नेते आता त्यांच्यासोबत नाहीत, त्यामुळे मागच्या निवडणूकीतला विजयाच निकष यावेळी लागवता येणार नाहीत असेही भाजपकडून सांगण्यात येत आहे.
 
रायगड लोकसभा मतदार संघातील पेण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांकडून रायगड लोकसभेचे उमेदवार भाजपचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील असणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
 
या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महामंत्री विक्रांत पाटील, पेण विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य कौसल्या पाटील, जिप सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, महेश मोहिते, रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, राजेश मपारा तसेच हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
 
pen
 
अबकी बार चारशे पार, फिर एक बार मोदी सरकार, कोणतेही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला, राज्य विधीमंडळात नाविण्यपूर्ण कामगिरी बजावणारा व निष्कलंक असा उमेदवार 32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने संपूर्ण पेण शहर दणाणून गेले होते.
 
केंद्रात 2014 मधे रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदार संघात प्रशांत ठाकूर यांनी कमळ फुलवीले. तर 2019 मधे पेण विधानसभा मतदारसंघात आमदार रविशेठ पाटील यांनी विजय संपादन केला. आता तर 2024 मधे सब कुछ भाजपा अशा प्रकारे चार विधानसभा पेण अलिबाग श्रीवर्धन आणि महाड या मतदारसंघात भाजपची 3 लाख 50 हजार मताधिक्य असल्याने आणि मोदी सरकारने राबविलेल्या जनहिताच्या योजनांचा अमंळ भाजपाचे वतीने झाल्याने रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपच्या कमळ चिन्हावर धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे असा निर्धार उपस्थित सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
 
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करू या, त्यांना केंद्रात साथ देण्यासाठी रायगडातून धैर्यशील पाटील खासदार झाले पाहिजे. काँग्रेस चे राहुल गांधी फक्त घोषणा करतात, मात्र कार्य काहीच नाही. अनेक वर्षे ज्यांनी रायगड मतदारसंघावर राज्य केले त्या गीतेंनी कोणताच विकास केला नाही. प्रत्येक योजना घरा घरात पोहचविण्यासाठी भाजप कार्यकर्ता काम करीत आहे.
 
विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून मतदार संघात करोडो रुपयांची कामे झाली आहेत. रायगड जिल्ह्यातील महायुती मधील राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रीत पणाने ही जागा जिंकून मोदींचे हात बळकट करु या, अबकी बार चारशे पार ही भाजपची घोषणा साध्य करु या असे ठाकूर यांनी सांगितले.
 
तर माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना सांगितले की, या अगोदर एकमेकांचे राजकीय दुश्मन असलेले पेणचे दोन राजकीय नेते एकत्र भारतीय जनता पार्टी मधे सहभागी असल्याने पेणची ताकद वाढली आहे. मी एक वर्षापूर्वी भाजप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामुळे राजकीय विरोध संपून पेण भाजपमय झाला आहे. 1980-85 साली पेणचे बॅरिस्टर ए.टी.पाटील खासदार झाले. आता 40 वर्षानंतर ही संधी आली आहे.
 
आज आमची ताकद वाढली असल्याने आजच्या सभेला दहा हजार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांचे काम माझ्यासह सहा आमदारनी केले होते. त्यांची त्यावेळी ताकद होती पण आता राजकीय संदर्भ बदलेत आज त्यांच्या सोबत यापैकी कुणीही नाहीत. भाजपची ताकद त्याच्यापेक्षा मोठी आहे. ही सर्व परिस्थिती भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळीकडे मांडावी अशी अपेक्षा करतो.
 
यावेळी भाजपचे अतुल काळसेकर, महेश मोहिते, वैकुंठ पाटील, मंगेश दळवी, विक्रांत पाटील आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी मोदी सरकारने राबविलेल्या योजनांन बाबत कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.
तटकरे नेते आहेत, त्यांनी एका मतदारसंघात अडकू नये
राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे हे महायुतीमधील एक प्रमुख नेते आहेत, त्यामुळे त्यानी निवडणूक लढवून एकाच मतदारसंघात अडकण्यापेक्षा, जास्तीत जास्त खासदार निवडूण आणण्यासाठी राज्यभर फिरावे असे आवाहन भाजप नेत्यांनी पेणमध्ये केला आहे. त्याचसोबत रायगडमधून माजी आमदार धैयशील पाटील यांनाच निवडूण आणण्यासाठी कामाला लागण्याचे संकेत नेत्यांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.