पेणमध्ये तरुणाची आत्महत्या; दोघे अटकेत

व्यवसायातील भागीदारांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले

By Raigad Times    26-Feb-2024
Total Views |
pen
 
पेण । व्यवसायातील भागीदारामुळे पेण येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येच्या आधी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यावरुन पेण पोलीसांनी दोघाना अटक केली असून एकजण फरार झाला आहे. वाशीनाका येथे राहणारा मंदार सुरेश म्हात्रे हा तरुण संजय शंकर पाटील (काळेश्री), मोहन शिवराम म्हात्रे (भाल) आणि अविनाश म्हात्रे यांच्यासोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय भागीदारीमध्ये करायचा.
 
त्यांचा एका व्यवहाराच्या पैशावरुन आपापसात वाद झाले. वादाला कंटाळलेल्या मंदारने कासमाळ येथे जाऊन पिंपळाच्या झाडाशेजारी जीवन संपवले.आत्महत्येच्या आधी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. मंदारला त्याचे भागीदार त्रास देऊ लागले. त्रासाला कंटाळून मंदाराने आत्महत्या केल्याची फिर्याद मंदारचा भाऊ मंगेश म्हात्रे याने पेण पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार, पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 
उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. प्रतिक पोकळे हे अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी मोहन म्हात्रे आणि अविनाश म्हात्रे यांना पोलिसांना अटक केली असून, संजय म्हात्रे याचा शोध पोलीस घेत आहेत.
 
दरम्यान, अटक केलेल्या दोघांना सकाळच्या सत्रात त्यांना न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे.