पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची नागरीकांमध्ये दहशत;एका दिवसात 48 जणांना कुत्र्याने घेतला चावा

24 Feb 2024 15:28:32
pen
 
पेण । पेण शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.गुरुवारी एकाच दिवसात 48 जणांना श्वानाने चावा घेतल्याची घटना पेण तालुक्यात घडली आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बल 329 जणांना कुत्रा चावल्याच्या घटनेची अधिकृत नोंद पेण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.
 
मात्र उप जिल्हारुग्णालयात अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याने रुग्णांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पेणमध्ये ठिकठिकाणी असणारी दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी पडलेली खराब झालेली मांस मच्छि आणि डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी बर्‍याच कुत्र्यांची झुंडच्या झुंड पहावयास मिळत असते.
 
या कुत्र्यांना या ठिकाणी पडलेले कुजके अन्न खाण्याची सवय लागल्याने कोणत्याही क्षणी वाट्टेल तेव्हा शिवशिवलेल्या दातांनी लचके तोडण्याची सवय या कुत्र्यांना लगेलेली आहे. पेणमध्ये बर्‍याच ठिकाणी असणार्‍या वर्दळीच्या जागेत वावरत असणार्‍या नागरिकांसह लहान मुलांना एकाच वेळी किमान चार ते पाच कुत्रे अंगावर येऊन चावे घेत असल्याचे प्रकार पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
 
पेण उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज व्हॅक्सिन जरी उपलब्ध असले तरी अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होउन त्यांना अलिबाग किंवा कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी पळापळ करावी लागत आहे. पेण तालुक्यात श्वानदंश हा प्रकार नवीन नसुन दरवर्षी असंख्य श्वानदंशाच्या शेकडो रुग्णांची नोंद होत असते. एका जानेवारी 2024 महिन्यात पेण उपजिल्हा रुग्णालयात 329 रुग्णांची अधिकृत नोंद झाली आहे.
Powered By Sangraha 9.0