रायगड : पेणमध्ये फार्महाऊसवर एमडी ड्रग्जची निर्मिती; ८ जणांची टोळी गजाआड

एमडीसह ड्रग्जसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

By Raigad Times    17-Feb-2024
Total Views |
MD Drugs
 
पेण : रायगड जिल्ह्यातील पेण येथील कलद गावातील एका फार्महाऊसमध्ये एमडी ड्रग्ज बनवून त्याची विक्री करणाऱ्या मुख्य सुत्रधारासह एकूण आठ जणांच्या ड्रग्ज माफिया टोळीस ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मनोज उर्फ बाळा लक्ष्मण पाटील (वय 45, पेण, जि.रायगड) असे ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. या सूत्रधारासह त्याच्या ७ ड्रग्ज तस्कर साथीदारांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून एमडी ड्रग्जसह एकूण 55 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
 
ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने 28 डिसेंबर 2023 रोजी जयेश प्रदीप कांबळी उर्फ गोलू (वय 25, आंबेडकर रोड, ठाणे) आणि विघ्नेश विनायक शिर्के उर्फ विघण्या (वय 28, वर्तकनगर, ठाणे) या दोन एमडी ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 78.8 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या दोघांनी एमडी ड्रग्ज कोठून आणले, याचा तपास करीत असतांना त्यांनी हे एमडी ड्रग्ज अहमद मोहम्मद शफी उर्फ अकबर खाऊ (वय 41, कुर्ला, मुंबई), शबीर अब्दुल करीम शेख ( वय 44, कुर्ला, मुंबई), आणि मोहमद रईस हनिफ अन्सारी (वय 47, कुर्ला, मुंबई) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अकबर खाऊ, शबीर शेख यांना 5 जानेवारी 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील चिंचोटी येथे 26 ग्रॅम एमडी व 4 किलो 850 ग्रॅम चरससह अटक केली. तर मोहमद रईस हनिफ अन्सारी यास 18 जानेवारी रोजी विरारमधून अटक केली.
 
अटक केलेल्या तस्करांची चौकशी केली असता या तस्करांना अमीर खान नामक ड्रग्ज पेडलर एमडीचा पुरवठा करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने 29 जानेवारी रोजी मुंबईतून मोहम्मद अमीर अमनतुल्ला खान (वय 44, कुर्ला) यास अटक केली. सदर ड्रग्ज मनोज पाटील नामक व्यक्तीकडून घेतले असून तो पेण येथील एका फार्महाऊसमध्ये एमडी निर्मिती करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. ठाणे पोलिसांनी अधिक तपास केला असता मनोज पाटील उर्फ बाळा नामक व्यक्तीस ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी याअगोदरही अटक केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो गुजरात राज्यातील लाजपोर जेलमधून पॅरोलवर मार्च 2023 मध्ये बाहेर येऊन नंतर परत जेलमध्ये हजर न होता फरार झाल्याची माहिती समोर आली.
 
अखेर 6 फेब्रुवारी रोजी मनोज पाटील उर्फ बाळा (वय 44, रा.पेण, जिल्हा-रायगड) याला रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून अटक करण्यात आली. तसेच त्याचा साथीदार दिनेश देवजी म्हात्रे (वय 38, पेण) यालाही पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी अटक केली. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची निर्मिती होत असताना स्थानिक पोलीस ठाण्याला याची भनकही लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गांजा व इतर अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असते.
यापूर्वीदेखील ड्रग्ज फॅक्टरीचा कट उघड
 
ठाणे पोलिसांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारे एका ड्रग्ज तस्कर टोळीला अटक करून कोकणात उभारल्या जाणाऱ्या ड्रग्ज फॅक्टरीचा मागील वर्षी पर्दाफाश केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एमडी ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लॅन अभिषेक कुंतल नामक तस्कराने आखला होता. कुंतल याने त्याचा साथीदार संतोष सिंग याच्यासोबत मिळून ऑक्टोबर 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लॅन आखला होता असे त्यावेळी उघड झाले होते.
फार्महाऊसमध्ये केमिकल वापरून एमडी ड्रग्जनिर्मिती
 
अटकेतील पेडलर आणि तस्करांच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीतून असे समोर आले की, मनोज पाटील उर्फ बाळा याने साथीदार दिनेश म्हात्रे व अमीर खान यांच्यासोबत मिळून पेण तालुक्यातील कलद गाव येथील एक फार्म हाऊस भाड्याने घेतले होता. यामध्ये विविध प्रकारचे केमिकल वापरून एमडी ड्रग्ज निर्मिती केली जात होती. जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज निर्मिती या तस्करांनी केली. त्यानंतर जागा मालकाला संशय आल्याने ही ड्रग्ज निर्मिती काही काळ बंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ड्रग्ज निर्मितीची तयारी मनोज करीत होता, असेदेखील पोलीस तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात आठही जणांच्या ताब्यातून एकूण 55 लाख 73 हजाराचे ड्रग्ज व अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे केमिकल व साहित्य जप्त केले आहे.