पनवेलकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट

बदलापूर ते पनवेल फक्त 15 मिनिटात,माथेरानच्या पर्वतरांगात तयार होतोय बोगदा

By Raigad Times    17-Feb-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल । बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणार्‍या या बोगद्याचे काम 2025 ला पूर्ण होणार आहे. यामुळे बदलापूर आणि पनवेलकराचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
 
बदलापूर शहरातून जाणार्‍या जेएनपीटी वडोदरा या महामार्गात येणार्‍या बोगद्याचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. माथेरानच्या पर्वतरांगातून जाणार्‍या या महामार्गात येणार्‍या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. या बोगद्यात दोन मार्गिका असणार आहे. सध्या या बोगद्याचे पनवेल आणि बदलापूर भागातील बेंडशीळ अशा दोन्ही बाजूने सुरू आहे. जुलै 2025 ला या बोगद्याच काम पूर्ण होणार आहे.
 
मुंबई - वडोदरा - जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यातून जात आहे. या महामार्गामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी माथेरानच्या पर्वतरांगातून बोगदा खोदला जात आहे. जुलै 2025 पर्यत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. या महामार्गामुळे बदलापूर आणि पनवेल हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटात पार करता येणार आहे.
  
दीड तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत
या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा दीड तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत होणार आहे. बदलापूर ते पनवेल हे जवळपास 38 किमीचे अंतर आहे. बदलापूर कटाई रोड मार्गे तळोजा बायपास द्वारे खोणी तलोळा मार्गे पनवेलला जाता येते. मात्र, या बोगद्यामुळे वळसा न घालता थेट बोगद्यातून अवघ्या 15 मिनिटांत हा प्रवास होणार आहे.
पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार
औद्योगिकदृष्ट्या हा महामार्ग गेम चेंजर ठरणार आहे. या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज दिला जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडले जाणार आहेत. नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.