पनवेल परिसरात नऊ दिवसांत चार घरफोड्या; नागिरकांमध्ये भीती

By Raigad Times    17-Feb-2024
Total Views |
  panvel
 
पनवेल । नवीन पनवेल परिसरामध्ये पायी चालणार्‍या व्यक्तींच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणार्‍या चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या आठवड्याभरात एकाच दिवशी तीन जबरी चोरीच्या घटनेनंतर पुन्हा पायी चालणार्‍या 73 वर्षीय वृद्धेला लुटीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पायी चालणारे रहिवासी भितीच्या सावटाखाली आहेत.
 
खांदेश्वरमधील 44 वर्षीय महिला सेक्टर 1 मधील शिवकृपा अपार्टमेन्ट समोरील रस्त्यावर पाळीव श्वानाला घराबाहेर फीरवत असताना रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास चोरट्याने त्यांचे मंगळसूत्र हिसकावले. या महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांना पोलीस ठाण्यात त्याच चोरट्यांनी अजून दोघांना लुटल्याचे समजले.
 
त्यापैकी दुसर्‍या घटनेत सेक्टर 4 मध्ये राहणार्‍या 48 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी शिवा कॉम्पलेक्स येथे चोरली. तर तीसर्‍या घटनेत 37 वर्षीय व्यक्तीला त्याच चोरट्यांनी पुमा शोरुमसमोरील रस्त्यावर लुटल्याचे पोलीस ठाण्यात समजले. या सर्व घटनांची एकत्रित नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
 
या घटनांनंतर खांदेश्वर आणि नवीन पनवेल परिसरात सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असताना दोन दिवसांपूर्वी नवीन पनवेल येथील सेक्टर 19 येथे राहणार्‍या 73 वर्षीय वृद्धा पायी चालत असताना एक चोरटा चालत येऊन त्याने वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तेथून पोबारा केला. ही घटना सेक्टर 12 येथे सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे.