रायगडमध्ये रंगणार महासंस्कृती महोत्सव

अवधुत गुप्ते, जाणता राजा, महाराष्ट्राची संस्कृतीसारखे कार्यक्रम पाहता येणार

By Raigad Times    10-Feb-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यामध्ये 12 फेब्रुवारीपासून चार दिवस महासंस्कृती महोत्सव रंगणार आहे. अवधुत गुप्ते, जाणता राजा, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकधारा सारखे मोठ मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रसिकांना विविध कार्यक्रमांची मोठी मेजवाणी मिळणार आहे. या महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.
 
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि रायगड जिल्हा प्रशासनाकडून आयोजित रायगड महासंस्कृती महोत्सव 2024 चे 12 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव पोलीस परेड मैदान अलिबाग येथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
12 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 7 नंतर अवधूत गुप्ते यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अशोक हांडे यांचा मराठी बाणा कार्यक्रम होणार आहे.
 
14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत नंदेश उमप यांचा महाराष्ट्राची संस्कृती कार्यक्रम होणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी रत्नकांत जगताप यांचा महाराष्ट्राची लोकधार संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी महानाट्य शिवबा होणार आहे. तसेच चारही दिवस चार ते सहा वाजेपर्यंत स्थानिक कलाकारांचे विविध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये कोळी संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम, आगरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम पारंपारिक लोकनृत्य, स्थानिक कलावंताचा दशावतार कार्यक्रम तसेच मर्दानी खेळ, पोवाडे यांचा समावेश आहे.