माजी कर्णधार कपिल देव यांनी कर्जतमध्ये घेतली 16 एकर जमीन

By Raigad Times    10-Feb-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत । भारताला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी कर्जत तालुक्यात आणखी एक जमिन खरेदी केली आहे. मोग्रज गावाच्या हद्दीतील 16 एकर जमिनीची खरेदी त्यांनी केली आहे. त्याचे दस्त शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी सह निबंधक कार्यलयात नोंदविलेे.
 
तालुक्यातील हेदवली येथील शेतकरी मोहन तुळशीराम गायकर यांची मोग्रज येथे असलेली 16 एकर जमिनी कपिल देव यांनी खरेदी केली आहे. त्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार आज नेरळ येथील सह निबंधक कार्यालय दोन येथे प्रभारी सह निबंधक मंगेश चौधरी यांनी नोंदवून घेतले.
 
या व्याव्हाराची गुप्तता पाळली असताना देखील लोकांना खबर पोहचलीच. कपिल देव यांच्या दस्ताचा नंबर आला, आणि त्यांचे वकील ऍड भूपेश पेमारे कपिल देव यांना घेऊन कार्यालयात पोहचले.शेतकरी गायकर आणि कपिल देव यांची गळाभेट त्यावेळी झाली आणि तो क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न लोकांनी प्रयत्न केला.
 
सह निबंधक चौधरी यांनी कपिल देव यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले आणि कपिल देव तेथून निघून आपल्या गाडीकडे पोहचले. तेथे वकील भूपेश पेमारे यांच्यासोबत चर्चा करून कपिल देव मुंबईच्या दिशेने रवाना झाले.कपिल देव यांनी याआधी 2022 मध्ये कोठिंबे येथे 25 एकर जमिनीची खरेदी केली त्यावेळी ज्याप्रमाणे गुप्तता पाळण्यात आली होती. अगदी त्याप्रमाणे यावेळीही कपिल देव यांच्या येण्याबाबत सह निबंधक नेरळ येथील कार्यालयातील कर्मचारी वगळता कोणालाही खबर नव्हती.
 
कर्जतमध्ये आपला देखील टुमदार बंगला असावा, अशी फर्माईश धनिकांमध्ये निर्माण झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब विश्रांतीसाठी कर्जतच्या फार्महाऊसवर पोहचले की, राजकीय वर्तुळात बातमी व्हायची. त्यांच्यामुळेफार्महाऊस संस्कृतीला वलय निर्माण झाले. आज कर्जत तालुक्यात असलेल्या फार्महाऊसमध्ये साहित्य, कला, क्रीडा, अर्थ, शिक्षण या सर्व क्षेत्रातील लोकांचे फार्महाऊस आहेत. त्यात राजकीय नेत्यांच्या असलेल्या टुमदार बंगल्यांमुळे कर्जत अधिक ठळकपणे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.