बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा

By Raigad Times    10-Feb-2024
Total Views |
 mumbai
 
मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन जणांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि हरित क्रांतीचे जनक एस. एम स्वामीनाथन यांच्या नावाचा समावेश आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.
 
काय म्हणाले राज ठाकरे?
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणार्‍या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो...बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे.
 
तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणार्‍या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.