कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारात सहभाग घेतला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला केवळ पाच दिवस शिल्लक असताना शेकापची भूमिका गुलदस्त्यात आहे.
लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष संजोग वाघेरे यांच्यासाठी ढाल बनून प्रचारात उताराला होता. त्यामुळे महायुतीला रोखण्यात आणि कर्जत तसेच उरण मतदारसंघात शेकापमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहिले होते. मात्र विधानसभा निवडणूक प्रचार संपण्याच्या जवळ आली तरी देखील शेकाप प्रचारात उतारलेला नाही.
शेवटच्या क्षणी शेकाप अपक्ष उमेदवार सुधाकर घरे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या सर्व सात मतदारसंघात शेकापच्या नव्या भूमिकेमुळे वादंग निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकापचा कर्जत मतदारसंघात पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना की अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडवण्यात महत्वाचा ठरणार आहे.