रोहा | वाढत्या ऑनलाईन खरेदीमुळे तसेच व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे ऐन दिवाळीपूर्व हंगामात व्यवसायासाठीच्या सुगीच्या दिवसात बाजारपेठेत थोडी शांतता असल्याचे चित्र सध्या रोहा बाजारपेठेत पहायला मिळत आहे. शनिवार व रविवारी या दिवशी बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले.
ऑनलाईनखरेदीच्या अॅपवरील नवनवीन ऑफर्स मिळणार्या डिस्काऊंटमुळे ग्राहकांचा कल जास्त ऑनलाईन खरेदीकडे वळला आहे. खरेदीसाठी मार्केटमध्ये न जाता हवी तशी वस्तू घर बसल्या मिळायला लागल्यामुळे खरेदीसाठी बाजारात जाणे कमी होत चालले आहे.
धाटाव औद्योगिक वसाहत लागून असल्याने पूर्वी रोहा बाजारपेठेत ग्राहकांची कायम रेलचेल असायची, पंचक्रोशीतील नागरिक खरेदीसाठी रोहा बाजारपेठेला प्राधान्य देत होते मात्र गेले काही वर्षांपासून ऑनलाईन खरेदीचे पेव फुटल्याने व ग्राहकांचा कल हा पनवेल, मुंबई येथील मोठ्या शॉपिंग मॉलमधून खरेदी करण्याकडे वाढल्याने स्थानिक बाजरपपेठेतील गर्दी रोडावली असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी एक दोन दिवसांवर आलेली असल्याने व्यावसायिकांनी आपली दुकाने वैविध्यपूर्ण वस्तूंनी भरली आहेत मात्र मालाला अपेक्षित उठाव नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठेमधूनच माल खरेदी करावाअशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांमध्ये फिरतांना दिसत असल्याने त्याचा परिणाम होईल, अशी अपेक्षा दुकानदारांना आहे. तसे झाल्यास ग्राहक पुन्हा स्थानिक बाजारपेठेकडे वळतील अशी अपेक्षा व्यवसायिक करत आहेत. पुढील एक दोन दिवसांत बाजारपेठेत गर्दी होईल असा अंदाज दुकानदार व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
ऑनलाईन खरेदीमुळे स्थानिक व्यवसायिकांचे नुकसान होत आहे, नागरिकांनी आपल्या स्थानिक दुकानदारांकडुनच वस्तु खरेदी करण्याकडे भर दिला पाहीजे. अडीअडचणीच्या काळात स्थानिक व्यवसायिकच मदतीचा हात पुढे करीत असतात तेव्हा स्थानिक व्यवसायिकांकडूनच वस्तूंची खरेदी केल्यासआपल्या बाजारपेठेत चैतन्य येऊ शकेल. नागरिकांनी सहकार्य केल्यास आपला पैसा आपल्याच गावात राहील, स्थानिकांना मदत मिळेल. -निखिल माधव दाते, व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते, रोहा