उरण | विधानसभा निवडणुकीत महाआघाडीकडून काँगे्रसला रायगड जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्यानेकाँगे्रसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या पदाचा राजीनामा रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांना सुपूर्द केला आहे. जिल्ह्यात एक जागादेखील काँगे्रसला मिळणार नसेल तर अन्य पक्षांचे ओझे आम्ही उचलणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आघाडीतील घटक पक्षांनी आपापले स्वंतत्र उमेदवार जाहीर केले आहेत. काँगे्रसच्या वाट्याला मात्र रायगड जिल्ह्यात एकही जागा आली नाही. त्यामुळे काँगे्रस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. रविवारी, २७ ऑक्टोबर रोजी काँगे्रसच्या हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे शेलघर येथील घर गाठले.
त्यांनी आपली कैफियत घरत यांच्याकडे मांडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरलेआहेत आणि पक्षाने एकही जागा जाहीर केलेली नाही. त्यामुळे आम्ही अन्य पक्षांचे ओझे उचलणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. काँग्रेस कार्यकर्त्यांमधील असंतोष शांत करण्याचा प्रयत्न घरत यांनी केला.
यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना घरत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, खरेतर लोकसभेची निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला पोषक होता; परंतु शिवसेनेने (ठाकरे गट) आपला उमेदवार उभा केला व एकही सीट काँग्रेस पक्षाला मिळाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले हे आदेश देतील त्याची अंमलबजावणी करु; मात्र बॅ.ए.आर. अंतुले यांच्या रायगड जिल्ह्यातील सात पैकी एकही जागा काँग्रेस पक्षाला मिळू नये, हे दुर्दैवी असल्याचे म्हणत महेंद्र घरत यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसे पत्र त्यांनी रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, रायगडात आघाडी आधीच बोलाची कडी होती. त्यात आता काँगे्रसनेही आक्रमक भूमिका घेतल्याने, रायगड जिल्ह्यातील महाआघाडी अखेरची घटका मोजायला लागली आहे.