कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर परशुराम घारे व त्यांची पत्नी नमिता हे ३३ कोटींचे मालक आहेत. त्यांच्याकडे अनेक गाड्या तसेच वेगवेगळ्या भागात जमिनी आहेत. तीन गुन्हेदेखील त्यांच्यावर दाखल आहेत. कर्जतमध्ये निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी राजीनामा देऊन, सुधाकर घारे निवडणुकीच्या रिंगणत उतरले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपतीचा उल्लेख आहे. सुधाकर घारे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून घारे यांनी २०२३-२०२४ या वर्षाचा कर परतावा करताना ८० लाख २६ हजार रुपयांचा टॅक्स भरला आहे. त्यांच्या पत्नीने ३१ लाख ५६ हजार एवढा टॅक्स भरला आहे. घारे यांच्याकडे सहा लाखांची रोकड, घारे दाम्पत्याकडे १३ लाखांचे सोने आहे.
घारे यांच्याकडे तीन महागड्या गाड्या असून ट्रॅव्हल व्यवसायमधील सहा बसेस त्यांच्या नावे आहेत. दोन दुचाकी आणि एक रुग्णवाहिका अशी एकूण ११ वाहने असून त्या सर्वांची एकूण किंमत साधारण दोन कोटींची आहे. सुधाकर घारे यांच्याकडे साधारण ५६ एकर जमीन असून कर्जत आकुर्ले, चोची, खरवंडी, खांडस, खरवंडी, हालिवली, माणगाव, मुळगाव आदी ठिकाणी असून त्याचे बाजारभाव साधारण १९ कोटी आहे.
तर नमिता यांच्याकडे चार एकर जमीन असल्याची नोंद आहे. सुधाकर घारे यांच्या विविध सात ठिकाणी सदनिका असून त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत पावणेपाच कोटी एवढी आहे. घारे यांच्यावर गृह कर्जे तसेच वाहन कर्जे असे एकूण दोन कोटी सात लाखांचे कर्ज आहे.
त्यांनी विविध बँका आणि अन्य आर्थिक संस्था त्यांच्यात साधारण तीन कोटीची गुंतवणूक केली असून एका भागीदारीत तीन कोटींची गुंतवणूक आहे. बांधकाम व्यवसायातदेखील घारे दाम्पत्याची गुंतवणूक आहे. सुधाकर घारे यांच्यावर मारझोड करणे, धमकावणे आणि फसवणूक करणे या स्वरूपातील तीन गुन्हे दाखल आहेत.