खोपोली । सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धूम आहे. जिकडे पहावे तिकडे निवडणुकीच्या मैदानात इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, कर्जत - खालापूर मतदार संघात येणार्या खोपोली शहराचा भरभरून विकास झाल्याचे लोकप्रतिनिधींकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे.
खोपोली शहरात भुयारी गटारासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा गवगवा लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. पण 100 कोटी भुयारी गटारासाठी खर्च होत असतांना वर्षभरापासून एका नामांकित बिल्डरच्या बिल्डिंगचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडण्यात आले आहे तसेच खोपोली शहरात अनेक ठिकाणी गटाराचे सांडपाणी पाताळगंगा नदीत सोडले जात असून नदीचे पाणी दूषित होत आहे.
भुयारी गटाराचे काम करण्यासाठी संपूर्ण शहरात रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने रस्त्यांची अक्षरश: दुरावस्था झाली आहे. अवजड वाहने रस्त्यावर अडकून पडत आहेत. खोपोलीकरांचा सुखाचा प्रवास दुःखात आला आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यात आणखी गॅस पाईपलाईन व केबल लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले जात आहेत.
या रस्त्यालगत भुयारी गटारची पाईपलाईन गेली असताना वर्षभरापासून सांडपाणी रस्त्यावर का येत आहे? भुयारी गटारासाठी 100 कोटींचा निधी शहराच्या विकासासाठी की नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करून ठेकेदार, लोकप्रतिनिधीचे खिशे भरण्यासाठी ? लोकप्रतिनिधींना खोपोलीकरांची काळजी नाही तर विकासकामांच्या नावाखाली आपले धंदे जोमाने चालविण्यासाठी असावी? असा संतप्त सवाल खोपोलीकरांमधून होत आहे.
गेल्या वर्षभरापासून हे सांडपाणी रस्त्यावर नाल्यासारखे धो-धो वाहत असून रस्त्यावर भला मोठा डबका बनला असून त्यात पाणी साठले आहे. पहाटे व सायंकाळी वॉकिंगसाठी नागरिकांची गर्दी असते तसेच शाळकरी विद्यार्थी, मंदिर, मस्जिद, नोकरी, व्यवसाय, खरेदीसाठी जाणार्या नागरिकांची पायी वर्दळ सुरु असून वाहनांची ही दिवसभर वर्दळ सुरू असते. एखादी वाहन भरधाव वेगात आले की हे सांडपाणी पायी जाणार्याच्या अंगावर उडल्याने कपडे घाण होतात.
तसेच या परिसरात राहणार्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे दिसून येत आहे. खोपोली शहरासाठी विकासाची गंगा आहे की रोगराई पसरून आरोग्य धोक्यात येण्याची घंटी ? खोपोली शहराच्या नावाखाली नक्की विकास कुणाचा शहराचा की लोकप्रतिनिधींचा ? चौथास्तंभ बोलले जाणार्या पत्रकारांना बसण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हक्काचे पत्रकार कक्ष, भवन देण्यासाठी दुर्लक्ष करण्यात आले तर विकासाची गंगा वाहिली तरी कुठे ? असा सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे.