नवी मुंबई | बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. नाईक बेलापूरमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ते अपक्ष लढतात की हातात तुतारी घेतात? याबाबतचा निर्णय मंगळवारी (२२ ऑक्टोबर) होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ऐरोली मतदारसंघातून भाजपचे नेते गणेश नाईक तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना तिसर्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये विस्तव जात नाही. त्यामुळे बेलापूरची उमेदवारी म्हात्रे यांना जाहीर होताच संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे.
संदीप नाईक यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या समर्थकांची एक बैठक वाशीतील भावे नाट्यगृहात त्यांनी आयोजित केली आहे. त्यामुळे संदिप नाईक नेमकी काय भुमिका घेतात याचा फैसला आजच होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, काही पदाधिकार्यांनी ‘तुम्ही शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घ्यावी’ अशी भूमीका मांडल्याचे समजते.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ऐरोली हा उद्धव ठाकरे यांच्याकडे तर बेलापूर शरद पवार गटाकडे असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा यांनी यापुर्वीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. बेलापूरमधून संधी मिळाल्यास तुतारी हाती घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. परंतु संदीप नाईक यांनी काय भूमिका घेतात? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.