पोलादपूर | प्रतापगडावरील आई भवानीच्या स्थापनेस ३६५ वर्षे यावर्षी पूर्ण झाली असून या निमित्ताने ८ ऑटोबर रोजी रात्री ८ वाजता किल्ले प्रतापगडावर ३६५ मशाली प्रज्वलित करुन मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. किल्ले प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने साक्षात आई भवानीच्या स्थापनेमुळे पुनित झालेल्या हिंदवी स्वराज्यातील एक महत्वपूर्ण स्थान म्हणजे प्रतापगड अशी ओळख आहे.
छत्रपती शिवरायांनी भोरप्याच्या डोंगराला तट बुरुजांचे शेला पागोटे चढवून स्वराज्यावर चालून आलेल्या उन्मत अफझलखानाचा येथेच कायमचा काटा काढला. या स्फूर्तीदायी घटनेने हिंदुस्थानच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली. हा भीम पराक्रम जिच्या कृपाशिर्वादाने प्रत्यक्षात आला. तिचे स्मरण म्हणून छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर आई भवानीचे मंदिर बांधून त्या ठिकाणी आदिशक्तीची स्थापना केली.
प्रतापगड निवासिनी आई जगदंबेच्या स्थापनेला २०१० साली ३५० वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून प्रतापगडावरील स्थानिक भुमिपूत्र चंद्रकांत उतेकर तथा आप्पा यांच्या कल्पनेतून प्रतापगडावर प्रथम २०१० साली ३५० मशाली प्रज्वलित करुन मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर दरवर्षी हा मशाल महोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रभरातून असंख्य शिवभक्त या महोत्सवात सहभागी होतात भवानी मातेची विधिवत पूजा झाल्यानंतर रात्री ९ च्या दरम्यान याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्चना वाघमले उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजीप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, प्रतापगड मशाल महोत्सव समितीचे प्रमुख चंद्रकांत उतेकर यांच्या हस्ते या महोत्सवाला प्रारंभ झाला.