तळोजात त्रिकुटासह २५ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

By Raigad Times    10-Oct-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल | नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने तळोजा परिसरातील एकटपाडा येथील एका इमारतीमध्ये धाड घालून मंगळवारी दुपारी २५ लाखांचा अंमली पदार्थाच्या साठ्यासह तिघांना अटक केली. मागील अनेक महिन्यांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. अंमली पदार्थाचा काळाबाजार नवी मुंबईत फोफावला आहे.
 
यापूर्वी पोलिसांच्या पथकाने विविध कारवाईत लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. तरीही अंमली पदार्थांचा काळाबाजार सुरुच आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उपायुक्त अमोल काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांना अंमली पदार्थाविरोधात सक्तीच्या कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
 
त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश धुमाळ, श्रीकांत नायडु यांच्या पथकाला तळोजातील एका इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करण्यासाठी एकटपाडा परिसरातील आय.जी. रेसीडेन्सी या इमारतीमध्ये सदनिका क्रमांक २०६ मध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पोलिसांनीधाड घातली.
 
यावेळी एक नायजेरीयन व्यक्तीसह दोन पनवेलकरांना अंमली पदार्थासह पोलिसांनी ताब्यात घेतले. या धाडसत्रात पोलिसांना सव्वालाख रुपयांच्या मेफेड्रॉन पावडरसह, २१ लाखांचे कोकेन असे १२७ ग्रॅम अंमलीपदार्थ सापडले. या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.