श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला

पीएम योजनेपासून पात्र शेतकरी वंचित

By Raigad Times    09-Jan-2024
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन । दिघी - समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव प्रयत्न करत आहे. मात्र, श्रीवर्धन प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे तालुक्यातील शेकडो पात्र शेतकरी सन्मान निधीपासून वंचित आहे. गेली दोन वर्ष शासनाच्या दारी हेलपाटे मारून हतबल झाला आहे.
 
श्रीवर्धन तालुक्यातील अल्पभूधारक, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच शेतीवरच आपलं उदरनिर्वाह चालवणार्‍या शेतकर्‍याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक महत्त्वाचा आधार मिळाला.मात्र, शेकडो पात्र शेतकर्‍यांना लाभमात्र, शेकडो पात्र शेतकर्‍यांना लाभ मिळत असताना अचानक बंद झालेला हप्ता कधी सुरू होणार? याची माहिती देण्यासाठी येथील प्रशासन अनभिज्ञ आहे.
 
गतवर्षी सर्व्हेक्षण करताना या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची विदा संगणक प्रणालीतून माहिती भरताना शासनाच्या कर्मचार्‍यांनी खूप मोठी चूक केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मिळणारा लाभ बंद झाला आहे. याची विचारणा लाभार्थी दोन वर्ष प्रशासनाकडे करत आहे. मात्र,सबंधित विभागाने हातवर करत प्रकरण राज्यस्तरावर असल्याचे सांगत आहे.
 
त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाला आहे. आता नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. तालुक्यात दुर्गम भाग मिळून जवळपास 80 गावांची संख्या आहे. येथील प्रत्येक कुटुंब पशुपालन तसेच शेती व्यवसायात जोडला आहे. मात्र,आता या योजनेचा मिळणारा लाभ बंद झाल्याने येथील शेतकरी दिघी ते हरिहरेश्वर या टोकापासून 17 ते 30 किलोमीरवरील अंतरात ये - जा करून तहसील विभाग तर कधी कृषी कार्यालयात चकरा मारून मेटाकुटीला आला आहे. मात्र, त्यांचा पदरात निराशाच मिळत आहे.