मराठ्यांनंतर आता ओबीसी देखील मुंबईत धडकणार

By Raigad Times    25-Jan-2024
Total Views |
 DHARASHIV
 
धाराशिव । एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईत धडकणार असतानाच आता ओबीसी समाज देखील आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल होणार असल्याचा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याकडून देण्यात आला आहे. सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला असून, अडीच कोटी मराठा समाजाला ओबीसीत आणण्याचे काम सुरू असल्याचे शेंडगे म्हणाले आहेत.
 
विशेष म्हणजे, शेळ्या, मेंढरं, जनावरं घेऊन आम्ही 26 तारखेला मुंबईत जाणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. धाराशिवमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला जीआर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून, याच जीआराच्या आधारे 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. एवढी लोकं ओबीसीमध्ये येत असतील, तर हा ओबीसीवर अन्याय होत असल्याचं सांगत हा जीआर रद्द करावा अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे.
 
ओबीसी बांधव मेंढ्या, शेळ्या व इतर जनावरांसह मुंबईत धडकणार असल्याचे देखील प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे. या मोर्चामुळे जर काही तणाव निर्माण झाला, तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचे देखील शेंडगे यांनी म्हटले आहेत.
धाराशिव येथे होणार्‍या ओबीसी सभेसाठी मंत्री छगन भुजबळ आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर येणार होते. मात्र, सभेचा वेळ होत आला असतांना ही हे दोन्ही नेते गैरहजर आहेत. यावर बोलतांना प्रकाश शेंडगे यांनी शाब्दिक चिमटे काढले आहेत.
 
ओबीसींच्या या मेळाव्यात येण्यापेक्षा छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांना राम प्राणप्रतिष्ठेचा विषय आणि त्यानंतरचे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत, असा खोचक टोला टोला लगावला आहे.ओबीसीसाठी ते काम करत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांनी ओबीसीच्या अन्नात माती कालवण्याचे काम केलं आहे. मात्र, ते ओबीसीसाठी नक्कीच गोड बातमी देतील, असेही मत प्रकाश शेंडगे यांनी धाराशिव येथील पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे.