माणगावचा बच्च बच्चा...जय श्री राम बोलेगा

By Raigad Times    24-Jan-2024
Total Views |
 mangoan
 
माणगांव / रविंद्र कुवेसकर ) । अयोध्या येथील राम मंदिरात संपन्न झालेल्या प्रभू श्री रामलल्ला मुर्ति प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने माणगांव शहरात श्री राम नवमी उत्सव कमिटी आयोजीत राम रथ शोभायात्रेत माणगांवकर राम भक्तांनी जल्लोष केला. या शोभायात्रेस थेट आयोध्येवरून विशेष श्री राम मूर्ती आणण्यात आली.
 
श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी शहरात हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. जय श्री राम च्या गजराने संपूर्ण माणगांव दुमदुमले.
या शोभायात्रेला बालाजी कॉम्प्लेक्स येथुन सुरूवात झाली पुढे मुंबई-गोवा महामार्गावरुन बाजारपेठ ते सोनभैरव मंदिर खांदाड येथे यात्रेची सांगता झाली.
 
या संपूर्ण शोभायात्रेत तरुणाईने डिजेच्या ठेक्यावर नाचत ’माणगांव का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा’ असा जयघोष केला. याप्रसंगी माणगांवातील बालकांनी राम, लक्ष्मण, सीता यांची वेशभूषा करून ती शोभायात्रेत सहभागी झाली. संपूर्ण शहरात भगवे झेंडे लावण्यात आले, रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महामार्गावर भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या.
 
शोभायात्रेत संपूर्ण तालुक्यातून हिंदु बांधव, महिला भगिणी तसेच श्री राम भक्त सर्व आजी माजी नगरसेवक, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकंप्रतिनीधी, पदाधिकारी व माणगांवकरांची लक्षणिय उपस्थिती होती. दुपारनंतर संपूर्ण माणगांवची बाजारपेठ स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली हे विशेष. तसेच सकाळी 10 वाजता खास आयोध्या येथून आणलेल्या श्रीराम मूर्तीला अभिषेक करण्यात आला.
 
या उत्सवा दरम्यान शोभा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील स्वतः उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.