रायगडातील 2 खासदार, 7 आमदार महायुतीच आहेत आणि राहतील-खा. सुनील तटकरे

By Raigad Times    12-Jan-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर । राज्यातील महायुतीचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक गावा-घरामध्ये पोहोचवा, म्हणजे आज रायगड जिल्ह्यातील दोन खासदार अन् सातही आमदार महायुतीचे शंभर टक्के आहेत; ते आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
 
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या तीन रस्त्यांचे भूमिपूजन खा.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले असता ते बोलत होते.यावेळी शिवसेना पक्षप्रतोद आ.भरत गोगावले, माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, चंद्रकांत जाधव, निलेश महाडीक, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत,महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा पवार, अनिल पवार,अनिल भिलारे, पोलादपूर तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
याप्रसंगी खा.तटकरे यांच्या हस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे मुंबई गोवा महामार्गापासून लोहारेखोंडा पार्टेकोंड तालुकाहद्द 384.84 लक्ष आणि चिंचवाडी, सुरबाचीवाडी,वझरवाडी तुर्भेखोंडा ते दिविल कुंभारवाडी 270.26 लक्ष तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुंबई गोवा महामार्ग लोहारे ते पवारवाडी रस्ता आदींचा शुभारंभ करण्यात आला.प्रास्ताविकामध्ये राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी, महाडचे पुढचे आमदार कोण ते सांगू शकतो पण रायगडचे खासदारकीचे उमेदवार कोण हे वरिष्ठांनी निश्चित ठरविल्यास कार्यकर्त्यांमार्फत मतदारांपर्यंत तसा मेसेज पोहोचविता येईल, असे सुचविताच खा. तटकरे यांनी शंका आहे काय, असा सवाल केल्यावर कळंबे यांनी खासदार आणि आमदार पुन्हा निवडून येतील, अशी भूमिका व्यक्त केली.
 
यावेळी लोहारे खोंडा येथील नियोजित धरणामधून आज शुभारंभ झालेल्या रस्त्याचे काम पाण्याखाली जाणार असल्याने हा मार्ग बदलून सरकारचे 75 लाख वाचवावेत,अशी भूमिका मांडली. यावेळी कळंबे यांनी राष्ट्रवादी आणि भाजपने शिंदे गटाविरोधात उमेदवार दिल्याने निवडणुका लागल्याची नाराजी व्यक्त केली.
 
यावेळी माजी खासदार गीते यांनी शपथ घ्यायला लावली त्यावेळी नेहमीप्रमाणे मुठी बंद नसल्याने रिकामे हात उंचावण्यात आल्याची टीका चंद्रकांत कळंबे यांनी केली.याप्रसंगी शिवसेना पक्षप्रतोद आणि महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी, विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते.
 
ते काय सावित्री नदीतून वर येऊन दिले नाही आणि देणारपण नाही. आमदार म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडत असतो तर खासदार म्हणून तटकरे त्यांची भुमिका पार पाडत असतात. लोहारेचा पुल मंत्रिपदाच्या माध्यमातून तटकरेंनी केला त्यावेळी आपण आमदार होतो, अशी आठवण सांगून पोलादपूर तालुक्याला तीन धरणं सुरू केली.
 
पोलादपूर तालुक्याला झुकतं माप दिले आहे. लोहारमाळ,तुर्भेखोंडापासून पोफळयाचा मुरा मार्गे आडावळयाला रस्ता जोडण्याची लोकांची अपेक्षा आहे. मिनी एमआयडीसीची मागणी पूर्ण होण्यासाठी इको सेन्सेटीव्ह झोनचा अडथळा आहे. क्रीडा संकुलाची मागणी आहे. त्यासाठी बाजिरे धरणालगतची जागा वापरणार आहे. क्रिकेट, झोंब्या तसेच कोणताही खेळ असो त्यासाठी देणग्या, बक्षिसे मागणार्‍या तरुणांची उपस्थिती आमच्या कार्यक्रमालाही अपेक्षित असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. याप्रसंगी पोलादपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या विविध मागणांच्या पूर्ततेसाठी आ.गोगावले आणि खा.तटकरे यांना निवेदन दिले.