झिराडमध्ये मुळशी पॅटर्न? कामाच्या वादातून एकाला बेदम मारहाण

भाजप उपाध्यक्ष छोटमशेट यांचे नाव आल्याने खळबळ

By Raigad Times    11-Jan-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग । मांडव्याजवळील झिराड परिसरात मुळशी पॅटर्न सुरु झाल्याचे चित्र आहे. धनदांडग्यांना जमिनी विकल्यानंतर त्या जागेवरील बांधकामे कोणी करावी, मटेरीयल कोणी टाकावे, यातून वाद निर्माण होताना दिसत आहेत. बुधवारी याच वादातून एका स्थानिकाला बेदम मारहाण होतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. काही इसम अक्षरशः ढोरासारखे एका तरुणाला मारत होते.
 
या प्रकरणात भाजप उपाध्यक्ष छोटमशेट यांचे नाव पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.अभिलाष पाटील हा तरुण पोल्ट्री व्यवसाय तसेच बांधकाम व्यवसाय करत आहे. बुधवारी (१० जानेवारी) सकाळी अभिलाष पाटील चोंढी येथील बँकेत ७ लाख 58 हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी निघाला असता, झिराड येथे आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला.
 
कंपनीत माल टाकण्याचे काम करायचे असेल, तर दिलीप भोईर तथा छोटमशेटला एक लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुला काम करून देणार नाही, अशी धमकी देत विक्रम सांळुखे, सोहेब मुल्ला, अनिकेत शिर्के, मोहम्मद शेख, संतोष सांळुखे व मनिष या सहा जणांनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
 
अभिलाष पाटील याला आडवे पाडून काठ्यांनी अक्षरश: ढोरासारखे झोडपून काढले. हा हल्ला झिराडमध्ये दिलीप भोईर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप अभिलाष पाटील यांनी केला आहे. याबाबत त्याने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
आपल्यावर हल्ला होईल, अशी भिती असल्यामुळे एक दिवस आधीच तसे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच गृहमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, मारहाणीत अभिलाष पाटील गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी झिराड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
कामावरुन धुमसत आहेत वाद
 
मुंबईपासून काही ममिनिटांत मांडवा, झिराडला पोहचता येते. त्यामुळे मुंबईतील अनेक उद्योगपती, सेलिब्रिटींनी या परिसरात जागा घेतल्या आहेत. मोठ्या प्रमाणात फार्महाऊसची बांधकामे सुरु आहेत. ज्या हद्दीत ही कामे सुरु आहेत, तेथील काम आपल्याला मिळावे, यासाठी स्थानिकच आपापसात एकमेकांची डोकी फोडताना दिसत आहेत. हे जर एवढ्यावरच थांबले नाही तर झिराडमध्ये 'मुळशी पॅटर्न' सुरु व्हायला वेळ लागणार नाही, अशी भिती व्यक्त होत आहे.
------------------------------------------------------ 
गावातील अनेक बांधकाम साहित्य पुरवठादार स्थानिकच आहेत. असे असतांना राजकीय द्वेषापोटी काही व्यक्तींकडून अपप्रचार करण्याचे काम सुरू आहे. स्थानिक बांधकाम साहित्य पुरवठादारांची वाहने अडवून, त्यांनाही शिवीगाळ आणि धमकवण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांत तक्रार आहे. मात्र मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि पक्षवाढीसाठी धडपड करत असल्यामुळे काही लोकांना पोटदुखी सुरु झाली आहे. ते या ना त्या कारणाने आपल्याला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करत आहेत.
- दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ, उपाध्यक्ष, भाजप

alibag
झिराडमध्ये कामावरून तरुणावर झालेला हल्ला निंदनीय आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तेथील गैरप्रकारावर अंकूश ठेवण्याची मागणी केली जाईल. ही हूकूमशाही कदापी सहन करणार नाही.
- चित्रलेखा पाटील,
शेकाप महिला आघाडी प्रमुख

alibag 
बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना दिलीप भोईरच्या काही मंडळींनी अडवले. काम करायचे असेल, तर दिलीप भोईर यांना एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर लाठी काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. मनमानी कारभार झिराडमध्ये सुरु आहे.
- अभिलाष पाटील, जखमी