बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तळा येथील एकाला अटक

ठासणीची बंदूक जप्त; रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

By Raigad Times    11-Jan-2024
Total Views |
arrest
 
अलिबाग । बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एकाला अटक केली आहे. तळा तालुक्यातील तारणे आदिवासीवाडी येथे केलेल्या या कारवाईत आढळलेली ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे.

8 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेकायदा शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी केलेल्या कारवाईत धनगर आळी, रोहा येथून तन्मय सतीश भोगटे (वय 24) याला अटक केली होती. घरझडतीमध्ये त्याच्याकडे रिव्हॅालर, बारा बोर बंदुके, चाकू, तलवारी, जिवंत काडतुसे, बंदुक बनविण्याचे साहित्य, विविध प्राण्यांची शिंगे व इतर शस्त्रसाठा सापडला होता.

याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेतील तन्मय भोगटे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक तन्मय भोगटे याने बनविलेली ठासणीची बंदुक लक्ष्मण जानू हिलम (वय 40, रा.तारणे अदिवासीवाडी, ता.तळा, जि.रायगड) याला दिल्याची माहिती दिली होती. त्यानुसार लक्ष्मण हिलम याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडे ठासणीची बंदुक सापडली. ही बंदूक जप्त करुन लक्ष्मण हिलम याला अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे करीत आहेत.

दरम्यान, ही कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे व तपास पथकाने केली आहे.