माणगाव । लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची घटना तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडली असताना अशाच प्रकारची तालुक्यातील आणखीन एक घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना डिसेंबर 2022 मध्ये घडली असून याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी गुरुवार 28 सप्टेंबर 2023 रोजी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
भावेश राजाराम यादव (वय - 23) याने पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही डिसेंबर 2022 मध्ये तिला आपल्या घरामध्ये बोलावून तिला लग्नाचे आमिष दाखवून तीच्यावर आत्यचार केल्याने ती गरोदर राहून तिची प्रसूती झाली.
या प्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात काँ. गु. रजि. नं. 309 /2023 भादवि संहिता कलम 376(2), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) कलम 4, 6, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पोंदकुळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व महिला पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक सतीष अस्वर हे करीत आहेत.