चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

ज्या वास्तुसाठी जिवन वेचले, त्याच वास्तुत जीवन संपविले

By Raigad Times    03-Aug-2023
Total Views |
sucide
कर्जत । चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. ते 57 वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे ज्या एनडी स्टुडिओसाठी दिवस- रात्र घाम गाळला त्याच स्टुडिओमध्ये नितीन यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे सिनेसृष्टीसह महाराष्ट्रात एक खळबळ उडाली आहे.
 
6ऑगस्ट 1965 ला ठाण्यात जन्मलेल्या नितीन देसाई यांचे बालपण मुंबईत आणि कोकणात गेले. दापोलीजवळ पाचवली गावातील निसर्ग त्यांच्यातील कलाकाराला घडवण्यास कारणीभूत ठरला. शालेय शिक्षण झाल्या नंतर त्यांनी जे.जे. व रहेजा या कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे कलादिग्दर्शनाचे धडे गिरवले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘तमस’, ‘चाणक्य’, ‘मृगनयनी’ यांसारख्या मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘परिंदा’, ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांसाठीही त्यांनी नितीशदांना साहाय्य केले.
 
1942 अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन करू लागले. या चित्रपटातील भव्य सेट्सनी सर्वांचे डोळे दिपवून टाकले आणि नितीन देसाई या नावाची जादू सगळीकडे पसरायला सुरुवात झाली. ‘खामोशी द म्युझिकल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंह’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जोधा अकबर’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘सलाम बॉम्बे’, ‘बुद्धा’, ‘जंगल बुक’, ‘कामसूत्र’, ‘सच अ लाँग जर्नी’, ‘होली सेफ’ या हॉलिवूडपटांसाठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले.
 
तब्बल चार चित्रपटांसाठी त्यांना कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटांखेरीज दूरदर्शन मालिकांसाठी, तसेच ‘गेम शोज’साठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘कौन बनेगा करोडपती’साठी देसाई यांनी उभारलेला सेट खूप गाजला. कलादिग्दर्शनामध्ये यश मिळाल्यानंतर देसाई यांनी चित्रपटांच्या आणि मालिकांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. ‘राजा शिवछत्रपती’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. त्यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटाचीही निर्मिती केली. ‘अजिंठा’ चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात उतरले.
 
नितीन यांनी ज्यावेळी मृत्यूला कवटाळले, त्यावेळी त्यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित होते, त्यांनी 1 ऑगस्टच्या रात्री नक्की काय झालं ती संपूर्ण परिस्थिती सांगितली. ई- टाइम्सशी बोलताना दिलीप म्हणाले की, ’आम्ही दिल्लीहून आलो आणि थेट स्टुडिओत गेलो. त्यांनी आपल्या अटेंडंटला बंगला उघडण्यासाठी सांगितले. कारण त्यांना थोडा वेळ आराम करायचा होता.’
 
‘त्यांनी काही वेळ विश्रांती घेतली. यानंतर काही काम असल्याचे सांगून ते दुसर्‍या मजल्यावर गेले अन् तिथे जाऊन त्यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत सापडले होते. पण त्यांनी आपले पवईचे कार्यालय विकल्याचे कधीही सांगितले नाही.
दिलीप हे फक्त नितीन देसाई यांचे मित्रच नाहीत तर त्यांनी जोश, मेला, देवदास, हम दिल दे चुके सनम या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
 
या प्रकरणी रायगडचे एसपी म्हणाले की, ‘सेटवर काम करणार्‍या एका कामगाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. ते सेटवर पोहोचले तेव्हा नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेतच होता. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.’
नितीन देसाई एनडी फिल्म स्टुडिओचे ते निर्माते आणि संस्थापक होते. एनडी स्टुडिओममध्ये मेला, जोश, मिशन कश्मीर, हम दिल दे चुके सनम, सलमान बॉम्बे, मुन्नाभाई एमबीबीएस, स्वदेश, प्रेम रतन धन पायो इत्यादी अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे.