रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी 360 कोटींच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीची मंजूरी

By Raigad Times    31-Jul-2023
Total Views |
dptc raigad
 
अलिबाग । रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2023-24 साठी 360 कोटींच्या आराखड्याल मंजूरी देण्यात आली आहे. तसचे अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 27.00 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी 43.06 कोटी, मंजूर करण्यात आली आहे.असे साधारणता 430 कोटींची मंजूरी रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
रायगड जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या आर्थिक वर्षातील जून 2023 अखेर झालेल्या 187.77 कोटीच्या खर्चास तसेच 68.32 कोटी रकमेच्या पूनर्विनियोजनास रविवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रु.320 कोटी तरतूद मंजूर करण्यात आली होता त्यानुुसार इतकाच निधी प्राप्त झाला होता. प्राप्त निधीपैकी जून 2023 अखेर 150.65 कोटी प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी 47.1 इतकी आहे.
 
अनुसूचित जाती उपयोजनेसाठी रु.25.64 कोटी तरतूद मंजूर असून रु. 25.64 कोटी निधी प्राप्त झाला होता. या प्राप्त निधीपैकी जून 2023 अखेर 11.63 कोटी प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी 45.4 इतकी आहे. आदिवासी उपयोजनेसाठी रु.41.06 कोटी तरतूद मंजूर असून रु.41.06 कोटी निधी प्राप्त झाला होता. या प्राप्त निधीपैकी जून 2023 अखेर 25.49 कोटी प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी 62.1 इतकी आहे.
 
आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यासाठी 1 हजार कोटी
कोकण विभागातील आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धूपप्रतिबंधक बंधारे, दरडप्रतिबंधक कामे तसेच बहुउद्देशीय निवारा केंद्र, भूमिगत विद्युत वाहिनी इत्यादी कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
 
खड्ड्यामुळे अपघात झाल्यास अधिकारी, ठेकेदारांवर होणार कारवाई
जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर तसेच राज्य महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याची कार्यवाही संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी विहित मुदतीत पूर्ण करावी. मुदतीनंतर खड्यांमुळे एखाद्या नागरिकांचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यानुषंगाने संबंधितावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिले.
 
जिल्ह्यातील 20 अतिधोकादायक गावांचे पुनर्वसन 
जिल्ह्यातील 20 अतिधोकादायक गावांचे पुनर्वसन प्राधान्याने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी. अशा दुर्घटना जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पनवेल महानगरपालिकेने ठाणे महानगरपालिकेप्रमाणे सुसज्ज आपत्ती प्रतिसाद पथक तयार करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
 
सहा महिन्यात पुर्नवसन
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त वाडीचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन कटिबध्द असून येत्या सहा महिन्यात सिडकोमार्फत शासकीय जमिनीवर कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
 
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणार
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई संदर्भात निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी केल्या. तसेच मत्स्यशेतीच्या पंचनाम्या संदर्भातही तपासून योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश दिले.
 
ग्रामीण भागांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्नबाबत पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे विशेष बैठक
जिल्ह्यातील 1 हजार 900 शेतकर्‍यांना रु.50 हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नसल्याचे आढळून आले, यासंदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. शासन व प्रशासन बांधितांच्या पाठीशी ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी पुरेशा निधी प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्याकडे विशेष बैठक तसेच जिल्हास्तरावर आढावा बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद इमारतीसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी दिले.
 
अंगणवाड्या भाडे दरात वाढ - ना. आदिती. तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाडेतत्वावर घेण्यात येणार्‍या अंगणवाड्यांच्या भाडयाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले. इर्शाळवाडी दुघर्टनेमध्ये जिल्हा प्रशासनाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था तसेच ग्रुप यांनी बचाव कार्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना आभाराचे पत्र देण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य शासनस्तरावरुन मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
 
विशेष निमंत्रित सदस्यांना पहिल्यांदा संधी
या बैठकीत विशेष निमंत्रित सदस्य हनुमंत यशवंत पिंगळे, उमा संदिप मुंडे, संजय चिमणराव देशमुख, शांताराम गणपत गायकर, चंद्रकांत विष्णू कळंबे,.राजेंद्र अशोकराव साबळे, अरुण रामचंद्र कवळे, निलेश शांताराम घाटवळ, अरुण जगन्नाथ भगत, प्रशांत विश्वनाथ शिंदे, प्रितम ललित पाटील,संतोष चंद्रकांत निगडे, राजेश शरद मपारा, एकनाथ लक्ष्मण धुळे, मोहम्मद हानीफ अब्दुल गफार मेमन, अमित अशोक नाईक यांना संधी.
 
बैठकीच्या शेवटी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी आपापसातील योग्य त्या समन्वयाने हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर विहीत कालावधीत खर्च करावा. या कामांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने कामे व्हावीत,अशी अपेक्षा पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांनी व्यक्त करून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला व सर्व उपस्थितांचे आभार मानले.