पेण तालुकाः सर्पदंशाने 12 वर्षीय ‘सारा’चा तडफडून मृत्यू

27 Jul 2023 14:52:21
 sara bite snek
 
जिल्हा रुग्णालय योग्य उपचार न मिळाल्याने साराचा मृत्यू झाल्याचा आरोप
 
पेण । सर्पदंशाने सारा ठाकूर या बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पेण तालुक्यातील जिते गावात घडली आहे. जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे योग्य उपचार न मिळाल्याने साराचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे नातेवाईक करत असून पेण तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
सारा ठाकूर हिला मंगळवारी (25 जुलै) रात्री झोपेत असताना मण्यार जातीच्या विषारी सर्पाने दंश केला. तिला तातडीने उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून अँटी स्नेक वेनिन इंजेक्शनही दिले.
 
साराचे वय 12 वर्षे असल्याने यावेळी एका खासगी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरचा सल्लाही घेण्यात आला. मात्र विषाची तीव्रता अधिक असल्याने साराला अलिबाग येथे पाठविण्यात आले. यावेळी शासकीय 108 नंबर च्या रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजनही संपल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सारा ठाकूरला कळंबोली येथील एम.जी.एम. रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
योग्य उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, साराच्या मृत्यूने जिते गावासह पेण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
Powered By Sangraha 9.0