उरणचे पोलीस उपनिरीक्षक विशाल राजवाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By Raigad Times    21-Jul-2023
Total Views |
uran police 
 
उरण | चिरनेर गावातील पुरग्रस्त रहिवाशांच्या मदतीसाठी धावून येणारे कर्तव्यदक्ष उरण पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकारी विशाल राजवाडे यांना चिरनेर गावकऱ्यांनी तसेच उरण पोलीस यंत्रणेने श्रध्दांजली अर्पण केली आहे. अतिवृष्टीचा तडाखा हा उरण तालुक्यातील २६ गावांना बसला असून बुधवारी ( दि १९) उध्दभवलेल्या पुर परिस्थितीत अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याची घटना घडली होती.
 
चिरनेर गावातील पुर ग्रस्ताच्या मदतीला उरण पोलीस यंत्रणा धावून गेले. त्यातील उरण पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे हे हिरीरीने सहभाग घेत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने चिरनेर गावातील तरुणांनी पोलीसांच्या मदतीने त्यांना डॉक्टरांकडे नेले त्यानंतर पोलिसांनी विशाल राजवाडे यांना मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान हृदयविकाराचा धक्का येऊन विशाल राजवाडे यांचे निधन झाले. कर्तव्य बजावत असताना उप पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने उरण पोलीस यंत्रणेने व चिरनेर गावातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.