जेएसडब्ल्यू प्रकल्पग्रस्त आंदोलनावर ठाम ; प्रकल्‍पग्रस्‍तांचे आता साखळी उपोषण

By Raigad Times    21-Jul-2023
Total Views |
jsw aandolan
 
अलिबाग | आमदार महेंद्र दळवी यांनी अल्‍टीमेटम देवून देखील प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या मागण्‍यांबाबत जे एस डब्‍ल्‍यू प्रशासन नमले नाही.
त्‍यांनी या प्रश्‍नावर मार्ग काढण्‍यासाठी त्‍यांनी दहा दिवसांची मुदत मागितली मात्र, त्‍याला आंदोलक प्रकल्‍पग्रस्‍तांनी स्‍पष्‍ट नकार दिला आणि आपले आंदोलन पुढे चालूच ठेवण्‍याचा निर्धार व्‍यक्‍त केला. दरम्‍यान, ज्‍या पाच जणांनी उपोषण सुरू केले होते त्‍यांनी उपोषण मागे घेतले असून आजपासून ग्रामस्‍थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. साळाव परीसरात असलेल्‍या प्रकल्‍पासाठी त्‍यावेळच्‍या कंपनीने तेथील शेतकऱ्यांची जमीन संपादीत केली होती.
 
आता हा प्रकल्‍प जेएसडब्‍ल्‍यू कंपनीकडे आहे. संपादीत जमिनीपैकी जी विनावापर पडून आहे ती परत करावी अशी मागणी करत पाच प्रतिनिधींनी 12 जुलैपासून जिल्‍हाधिकारी कार्यासमोर उपोषण सुरू केले. यासंदर्भात आमदार महेंद्र दळवी यांच्‍या प्रमुख उपस्थितीत प्रकल्‍पग्रस्‍त , प्रशासन आणि कंपनी व्‍यवस्‍थापन यांच्‍यात 18 जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत सर्वमान्‍य तोडगा निघाला नाही. त्‍यामुळे आमदार महेंद्र दळवी यांनी जेएसडब्‍ल्‍यू व्‍यवस्‍थापनाला अल्टिमेटम दिला होता .दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर कंपनी बंद पाडू असा इशारा आ. दळवी यांनी दिला होता.
 
त्यानुसार, आाज बैठक होणे अपेक्षित होते. परंतु, ती झालीच नाही. कंपनीने आंदोलकांची भेट घेवून हा प्रश्‍न गुंतागुंतीचा असल्‍याने त्‍यावर मार्ग काढण्‍यासाठी आणखी दहा दिवस आम्‍हाला मुदत द्या आणि आपले उपोषण मागे घ्‍या असा प्रस्‍ताव ठेवला मात्र आंदोलकांनी तो धुडकावून लावला. त्‍यानंतर कंपनीने प्रशासनाच्‍या मार्फत तोच प्रस्‍ताव ठेवला परंतु तो मान्‍य केला नाही. आज सकाळी प्रकल्‍पग्रस्‍त शेतकरी मोठया संख्‍येने जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमले. त्‍यांनी जे एस डब्‍ल्‍यू कंपनी आणि जिल्‍हा प्रशासनाचा निषेध केला. यापुढेही आंदोलन सुरूच ठेवण्‍याचा निर्धार यावेळी व्‍यक्‍त केला . गेले नऊ दिवस ज्‍यांचे उपोषण सुरू होते त्‍यांनी आपले उपोषण मागे घेतले. आजपासून दररोज दहा ग्रामस्‍थ साखळी उपोषण करतील असा निर्णय घेवून त्‍याची अंमलबजावणी सुरू केली.