इरशाळवाडीवर दरड कोसळली आणि... क्षणात होत्याचं, न्हवतं झालं!

१६ जणांचा मृत्यू ; सहा जखमी, ९८ जण सुखरुप

By Raigad Times    21-Jul-2023
Total Views |
earshal vadi darad 1
 
खालापुर | तालुक्यातील इर्शाळगडाच्या पोटात वसलेल्या इशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून सहजण जखमी झाले आहे. वाडीतील ९८ लोकं सुखरुप असल्याची आहेत. मात्र ढिगार्‍याखाली किती लोकं गाडली गेली यांचा अचुक आकडा उपलब्ध झालेला नाही. मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. इरशाळवाडीत ४८ कुटुंब (२२८ लोकसंख्या) होती. त्यापैकी २५ ते २८ कुटुंब बाधित झालेली आहेत. २२८ पैकी ७० नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहिती आहे व २१ जखमी असून त्यापैकी १७ लोकांना तात्पुरत्या बेस कॅम्पमध्ये उपचार करण्यात आले. ६ लोकांना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत.
 
या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तासाभरात घटनास्थळी दाखल झाली. पण पाऊस आणि अंधारामुळे बचावकार्य सकाळीच सुरु करावे लागले. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि वार्‍याने बचाव पथकाची परीक्षा घेतली. पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपयरत पोहोचण्यास मदत पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी घटनास्थळी तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यास अडचणी उद्भवल्या. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी असल्याने मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरीक, एनडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू करण्यात आले. त्याशिवाय, ट्रेकर्स ग्रुप, स्वयंसेवी संस्था देखील मदतीसाठी सरसावल्या.
 
अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू : मध्यरात्री या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्यसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, इर्शाळवाडीतील घटनास्थळी पोहचत असताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटयानेमृत्यू झाला.
 
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत :
इरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या
दुर्घटनेतल्या जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
 
मुख्यमंत्री शिंदे ठाण मांडून....
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील सकाळपासून घटनास्थळी दाखल झाले होते. मध्यरात्रीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. मदत आणि बचाव कार्यावर त्यांनी देखरेख ठेवली. त्याशिवाय, मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश बाल्दी यांनी मध्यरात्रीच घटनास्थळ गाठले होते. त्याशिवाय, पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, अनिल पाटील, अदिती तटकरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी नेत्यांनी घटनास्थळाजवळ भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तर, सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून बचाव कार्याचा आढावा घेत यंत्रणांना सूचना दिल्या.
 
शिक्षणासाठी वाडी बाहेर असलेली मुलं सुखरूप पण...
इरसालवाडीतील अनेक लहान मुलं शिक्षणानिमित बाहेर आहेत. काही पनवेल, माणगाव येथील आश्रम शाळेत आहेत. ही मुलं सुदैवाने गावाचेनाव सांगू शकतील परंतु अनेकांचे कुटुंबच राहिलेले नाही. घर जमीनदोस्त झाले आहेत्यामुळं हे विद्यार्थी जेव्हा वा पायथ्याशी पोहचले तेव्हा अक्षारश आक्सबॉक्सी रडत होते.
 
गावकर्‍यांनी सुरक्षित ठिकाणी झोपड्या बनवलेल्या पण.....
गावकर्‍यांनी डोंगराच्या पायथ्याशी खाली अशा दुर्घटनेपासून वाचण्यासाठी झोपड्यादेखील  नवल्या होत्या, पण वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी त्या झोपड्या पाडून टाकल्या, अशी माहिती या गावकर्‍यांनी दिली. तसेच आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षित ठिकाणी झोपड्या बनवल्या म्हणून धमकी देखील आल्याचं गावकर्‍यांनी सांगितलं.
 
मयत इसमांची नावे :-
१. रमेश हरी भवर, वय... २६ वर्ष
२. जयश्री रमेश भवर, वय...२२ वर्ष
३. रुद्रा रमेश भवर, वय... १ वर्ष
४. विनोद भगवान भवर, वय... ४ वर्ष
५. जिजा भगवान भवर, वय... ३६ वर्ष
६. अंबी बाळू पारधी, वय... ४५ वर्ष
७. बाळू नामा पारधी, वय... ५२ वर्ष
८. सुमित भास्कर पारधी, वय... ३ वर्ष
९. सुदाम तुकराम पारधी, वय... १८ वर्ष
१०. दामा भवर, वय... ४० वर्ष
११. चंद्रकांत किसन वाघ, वय... १८ वर्ष
१२. राधी रामा भवर, वय... ३७ वर्ष
१३. बाळी नामा भुतांब्रा, वय... ७० वर्ष
 
जखमी इसमांची नावे :-
१. प्रविण पांडुरंग पारधी, वय... २१ वर्ष
२. यशवंत राघो डोरे, वय... ३७ वर्ष
३. भगवान हरी भवर, वय...२५ वर्ष
४. मनिषा यशवंत डोरे, वय...३५ वर्ष
५. रामी रामु पारधी, वय... ७७ वर्ष
६. कमली महादु पारधी, वय... ५० वर्ष