रोहा धाटाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना

उष्णघातामुळे गोडाऊन जळून खाक; १ गंभीर

By Raigad Times    07-Jun-2023
Total Views |
Roha MIDC Fire 
 
रोहा | धाटाव एमआयडीसीतील खाद्य पदार्थांसाठी रंग तयार करणाऱ्या रोहा डाय केम या कंपनीतील गोडाऊनमध्ये बुधवारी दुपारी १ वा. सुमारास आगीची भीषण घटना घडली. उष्णघातामुळे गोडाऊन मध्ये लागलेल्या आगीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 MIDC Fire
 
धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील खाद्य पद्धार्थ तयार करण्यासाठी लागणार रंग तयार करणाऱ्या रोहा डाय केम कंपनीत गोडाऊन मध्ये आगीची दुर्देवी घटना घडली. गोडाऊनमध्ये कोळसा स्टॉक करून ठेवला होता. उष्णघातामुळे कोळश्याने पेट घेतला. क्षणात गोडाऊन मध्ये असलेल्या शेफर, सोडीयम नायट्रेड, सल्फेरिक इत्यादी कच्चा माल व घातक रसायनने पेट घेत आगीचे लोण सर्वत्र पसरले. क्षणातच गोडाऊनमध्ये रसायन भरलेले ड्रमचे स्फ़ोट होत असल्यामुळे कंपनी अधिकारी व कामगार वर्गाची तारांबळ उडाली होती. प्रयाग( बाळू ) हशा डोळकर ( ३३ वर्ष रा. खरापटी ता. रोहा ) असे गंभीर जखमी कामगाराचे नाव असून आगीत भाजल्यामुळे तब्बेत गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांस तातडीने मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
 
या आग दुर्घटनेनंतर रोहा डाय केम कंपनी लगत असलेल्या बेक केमिकल कंपनीला वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसला. खबरदारीचा उपाय म्हणुन बेक केमिकल कंपनी व राठी डाय केम कंपनीतील शेकडो कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आग आटोक्यात आण्यासाठी ४ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे दीपक नायट्रेड कंपनीचे सेफ्टी मॅनेजर शैलेंद्र तांडेल, सहकारी गौरव पाटील यांनी जातीले लक्ष घालून दीपक नायट्रेड कंपनीतील अग्निशमन वाहन, फायर फायटिंग टीम यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आंथिया कंपनीचे प्रकाश शेटे व अन्य कंपनी अधिकारी वर्गाने देखील मेहनत घेतली.
 
यावेळी केंद्रीयमंत्री प्रल्हादसिंहा पटेल, आम. प्रशांत ठाकूर, आम. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची चौकशी केली.