लोड टेस्टींगसाठी साळाव पूल आज पासून तीन दिवस वाहतुकीसाठी बंद

By Raigad Times    07-Jun-2023
Total Views |
Alibag Salav pool
 
अलिबाग | अलिबाग-मुरूड - रोहा या तीन तालुक्यांना जोडणाऱा दुवा साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या पुलावरून पाच टनांवरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातलेली आहे. महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू नये, यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज गुरुवार ८ जूनपासून तीन दिवसांसाठी पूल बंद असणार आहे मात्र या कालावधीत वाहनांची वाहतूक वगळता फक्त प्रवाशांना मार्गदर्शनानुसार पायी चालत जाता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

salav pool vahtukis band 
 
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा - साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने; तसेच पुलाची पुनर्बांधणी व लोड टेस्टिंगचे काम करण्यासाठी रेवदंडा- साळाव पूल पुढील २० दिवसांसाठी पुलावरून ५ टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. यात ८ ते १० जून या तीन दिवसांदरम्यान पुलाच्या लोड टेस्टिंगचे काम केले जाणार आहे. त्यासाठी हा पूल तीन दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.
 
अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड- वडखळ- नागोठणे-कोलाड-साळावमार्गे पर्यायी मार्ग आहे. तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रोहा-तळेखार-साळावमार्गे आहे. मुरूड-अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरूड- साळाव - तळेखार-चणेरा-रोहा-कोलाड-नागोठणे-वडखळ-पोयनाड-अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापरही करू शकतात.साळावचा पूल तीन दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी प्रवाशांना मार्गदर्शनानुसार पायी चालत जाता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.