अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ घोंगावतोय; कोकण किनारपट्टीला धोका नाही

06 Jun 2023 18:40:40
 बिपरजॉय चक्रीवादळ
 
अलिबाग । भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात तयार होत असून पाकिस्तानला धडक देण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आल्यामुळे कोकणवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. चक्रिवादळाचा परिणाम केरळात धडकणार्‍या मान्सूनवर होणार आहे. परिणामी कोकणाच्या दिशेने सरकत येणारा मान्सूनही उशिरा होणार आहे.
 
अरबी समुद्रात खोलवर हे चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीवर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. तसंच, चक्रीवादळामुळे येणार्‍या पावसाचीही शक्यता नाही. परंतु, मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
 
तसंच, 8, 9, 10 जून रोजी कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्‍याचा वेग 40-50 घचझक असण्याची शक्यता आहे. या काळात नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं ट्वीट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
 
बिपरजॉय चक्रीवादळाची दिशा काय?
 अरबी समुद्रात खोलवर सोमवारी सायंकाळी चक्रीवादळ वेगाने तीव्र झाले. मंगळवार सकाळपर्यंत या चक्रीवादळाचा वेग वाढत गेला आणि वादळ आग्नेय अरबी समुद्रावर येऊन धडकले. हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनार्‍यापासून 920 किमी अंतरावर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून 1120 किमी अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण भागापासून 1160 किमी, तर पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून 1520 किमी अंतरावर आहे.
Powered By Sangraha 9.0