रायगडच्या पोरी हुशार!

जिल्ह्याच्या दहावीचा निकाल 95.28 टक्के

By Raigad Times    02-Jun-2023
Total Views |
Raigad 10th Result
 
अलिबाग । रायगड जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.28 टक्के लागला असून, या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 96.68 टक्के मुलींनी तर 93.99 टक्के मुलांनी दहावीचा महत्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. जिल्ह्याच्या निकालात तळा तालुका 97.15 टक्के मिळवून पहिला आला आहे.
 
करिअरच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा म्हणून दहावीकडे पाहिले जाते. रायगड जिल्ह्यातून 34 हजार 474 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी 32 हजार 847 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 8 हजार 951 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 12 हजार 887 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 8 हजार 686 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
 
निकालामध्ये मुलींची बाजी
जिल्ह्याच्या दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या 32 हजार 847 विद्यार्थ्यांमध्ये 15 हजार 966 मुली तर 16 हजार 881 मुलांचा समावेश आहे. उत्तीर्ण होण्याचे मुलींचे प्रमाण 96.68 टक्के असून मुलांचे प्रमाण 93.99 टक्के आहे.