अलिबाग मुकबधीर शाळेचे काम सुरु करा, अन्यथा...

आ. महेंद्र दळवी यांच्या दणक्यानंतर संबधीत ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश

By Raigad Times    28-Mar-2023
Total Views |
mahendra dalvi
अलिबाग । विद्यानगर येथील मुकबधीर विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचे शुभारंभ 2021 झाली. मात्र अजून एक विटही ठेकेदाराने रचलेली नाही. कामाला उशिर होत असल्याने मुलांची अडचण होत आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम सुरु करा अन्यथा संबधीत ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून नवीन नेमा अशी मागणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्याकडे केली आहे.
 
15 ऑगस्ट 2021 साली तत्कालीन पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचा शुभारंभ झाला होता. तत्पुर्वी जिर्न इमारतीत शिक्षण घेणार्‍या मुकबंधीर विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले. परंतू याला आता चार वर्ष होत आली तरी कामाला धड सुरुवातदेखील झालेली नाही. त्यामुळे या मुलांचे आणि त्यांच्या पालकांची गैरसोय होत असल्याचे आ. दळवी यांनी म्हटले आहे.
 
मुकबधीर विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या अनास्थेमुळे भाड्याच्या शाळेतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांनी म्हटले आहे. 4 वर्ष झाली तरी इमारतीचे काम होत नसेल तर जिल्हा परिषद प्रशासन संबधीत ठेकेदाराचे कशासाठी लाड करत आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे. मुकबंधीर शाळेच्या इमारतीचे काम सुरु करुन या विद्यार्थ्यांची परवड थांबवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 
विद्यानगर येथील शासकिय मुकबधीर विद्यालय 35 वर्ष जूने होते. जीर्ण झालेल्या इमारतीमुळे त्याठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने स्वनिधीतून दोन कोटी 46 लाख 92 हजार रुपयांची तरदुत केली. 31 गुंठे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यामध्ये आठ वर्ग खोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थान, विद्यालयातील अधिक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान, श्रवण चाचणी खोली, वैद्यकिय कक्ष, अंतर्गत खेळाची खोली व सुसज्ज असा सभागृह असणार आहे.
 
मुकबधीर विदयार्थ्यांना खेळण्यासाठी गार्डन, क्रीडांगण तसेच भोजन कक्ष, स्वयंपाकी निवासस्थान, व्यवसायिक प्रशिक्षण हॉल, पहारेकरी निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र अद्यापही नव्या मुकबधीर विद्यालयाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याचा फटका मुकबधीर विद्यार्थ्यांना व कर्मचार्‍यांना बसत आहे. सध्या मुकबधीर विद्यालय भाड्याच्या घरात आहे. परंतू पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व तेथील कर्मचार्‍यांना शिकविताना अडचणी निर्माण होत आहेत.
 
दरम्यान, आ. महेंद्र दळवी यांच्या मागणीनंतर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी तातडीने या कामाचा अहवाल मागवून घेतला आहे. तसेच संबधीत ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.