अलिबाग-रोहा रस्त्याचा श्रेयवाद: शिवसेनेच्या धक्क्यानंतर भाजप बॅकफूटवर; आमदार दळवी यांनीच पाठपुरावा केल्याचे भाजपकडून स्पष्ट

26 Mar 2023 23:08:38
 bjp chotam shet
 
अलिबाग । अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारी भाजप शिवसेनेच्या दणक्यानंतर बॅकफूटवर आली आहे. अलिबाग-रोहा रस्त्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांनीच पाठपुरावा केल्याचे भाजपचे संघटक सतिश धारप यांनी स्पष्ट केले आहे. या रस्त्याचे काम विनाअडथळा व्हावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
अलिबाग-रोहा या बहुप्रतिक्षीत रस्त्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरू झाले; मात्र या कामाच्या श्रेयावरुन शिवसेना (शिंदे गट) अणि भाजपमध्ये ड्रामा पहायला मिळत आहे. भाजपचे नेते दिलीप भोईर यांनी कामाच्या ठिकाणावरुन फोटो व्हायरल केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनीदेखील पुन्हा नारळ फोडला. तसेच ‘काल आले आणि नारळ फोडायला धावले’ अशी टिका भोईर यांच्यावर मानसी दळवी यांनी केली. त्यामुळे या दोन मित्रपक्षांत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 
रोहा-अलिबाग रस्त्याला 2016 सालीच मंजूरी मिळाली होती. वर्कऑर्डर निघेपर्यंत 2019 उजडले आणि काम सुरु व्हायला आणखी दोन वर्षे गेली. 2021 साली अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला. मात्र यानंतर ठेकेदाराला 18 कोटी दिल्यानंतरही हे काम झेपले नाही. त्यामुळे हे काम पुन्हा तसेच राहिले. आता पुन्हा दोन वर्षांनी म्हणजेच 2023 साली गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन ठेकेदाराने काम सुरु केले. यादरम्यान आ. दळवी यांचा पाठपुरावा सुरुच होता.
 
मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी या रस्त्याचे काम सुरु होत असल्याची माहिती भापजचे उपाध्यक्ष दिलीप भोईर यांना भाजपच्या एका नेत्याने दिल्याचे कळते. त्यानुसार भोईर यांनी रोहा-अलिबाग रस्त्यावर नारळ फोडला आणि शिवसेना नेत्यांमध्ये संतपाची लाट पसरली. आ. दळवी यांच्या पश्चात भाजपने केलेली ही हरकत शिवसेनेला आवडली नाही. त्यामुळे मानसी दळवी यांनी कडक शब्दांत भोईर यांना तंबी दिली होती.
 
आ. महेंद्र दळवी हेदेखील संतप्त झाले होते. त्यामुळे या आगीचे चटके आणखी बसू नये म्हणून भाजपचे संघटक सतिश धारप यांनी शनिवारी या विषयावर पाणी टाकले. शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत. आ. महेंद्र दळवी यांच्या पाठपुराव्यामुळेच हा रस्ता होत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. तसेच हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेदेखील आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
 
या सर्वांत नव्यानेच शेकापमधून भापजमध्ये प्रवेश केलेले झिराड येथील दिलीप भोईर (छोटमशेट) यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली. भाजपच्या एका नेत्याच्या सांगण्यावरुन भोईर रोहा-अलिबाग रस्त्यावर उतरले खरे; मात्र या रस्त्याचे श्रेय घेणाचा पहिलाच प्रयत्न शिवसेनेने उधळूून लावला आहे.
यानंतर धारप यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये उद्भवलेला संघर्ष तूर्तास थांबला असल्याचे दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0