रोहा : शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी ; तहसिलदारांना दिले निवेदन

By Raigad Times    25-Mar-2023
Total Views |
Shetkarysathi nivedan
 
रोहा | हवामानातील बदलामुळे रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावातील शेतकरी वर्गाच्या शेती क्षेत्राचे झालेल्या नुकसान भरपाईसाठी तहसिलदारांना निवेदन देऊन शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी लक्ष वेधले आहे.
 
तालुक्यात शेतकरी व मजूर वर्गाच्या हितासाठी कार्यरत असणार्‍या कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्था यांच्या वतीने सदरील निवेदन देण्यात आले आहे.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका कांबळे, सचिव मच्छिंद्र पाटील, भातसई विभाग प्रमुख निवास खरिवले, धामणसाई विभाग प्रमुख सतीश खांडेकर,सदस्या आदिती थिटे, रुपाली देवकर, कविता भोईर आदींसह अन्य सदस्य तसेच शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
 
कृषीनिष्ठ बाहे गावातील शेतकरी वर्गाचा ताजी भाजीपाल्याची शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. या भाजीपाला शेती क्षेत्रात हमखास पिक देणारे मिरची पिक हे किडरोगाचा प्रादूर्भाव वाढल्याने धोक्यात आले आहे.
 
किटकनाशके तसेच औषधांची फवारणी करून देखील किड हटत नसलेल्या व फुलगण होत असल्र्याने चालू हंगामात नफा तर सोडाच पण मुद्दलही निघाली नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. याबाबत शेती क्षेत्राची पाहणी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र किल्ला येथील तज्ज्ञांनी भेट दिली असता वातावरणातील बदलांचा परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.तर शेतकरी वर्गाच्या या समस्येची दखल घेऊन शेतकरी व मजूर सामाजिक संस्था यांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन शेती क्षेत्राचे पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई कशी मिळेल याकडे लक्ष वेधले आहे.