रायगडमधील नद्या प्रदुषणाच्या विळख्यात; राज्यातील सर्वात जास्त प्रदुषीत नद्यांमध्ये सावित्री नदीसह 4 नद्यांचा समावेश

By Raigad Times    21-Mar-2023
Total Views |
Patal Ganga Nali
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. राज्यातील सर्वात जास्त प्रदुषीत 4 नद्यांमध्ये सावित्री नदीचा समावेश आहे. तर प्रदुषणाच्या तिसर्‍या वर्गवारीत कुंडलिका, पाताळगंगा नदी असून अंबा आणि उल्हास नदी पाचव्या वर्गवारीमध्ये आहेत. औद्योगिक प्रदुषण आणि शहरातून सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यामुळे या नद्या दिवसेंदिवस प्रदुषीत होत आहेत, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे.
 
सीपीसीबीच्या अहवालात देशभरातील 603 नद्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यापैकी 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 279 नद्यांमधील 311 नदीपट्टे प्रदूषित असल्याचे आढळून आले. त्यात सर्वाधिक 55 प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात आहेत. यात सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा आणि उल्हास या रायगड जिल्ह्यातील नद्यांचा समावेश आहे. नदीकाठच्या गावांमधील सांडपाणी आणि उद्योगांमधील सांडपाणी नदीत सोडले जात असून पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावत चालली आहे.
 
रासायनिक घटक तसेच इतर टाकाऊ वस्तूंमुळे नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. पर्यायाने त्या भागातील नदीच्या परिसंस्था धोक्यात येणार असल्याने त्याचा दुष्परिणाम निसर्ग आणि मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता या अहवालातून दिसून येत आहे.
 
या गोड्या पाण्याच्या नद्या प्रदुषीत झाल्याने नदीकाठच्या गावांना या नद्यांमधील पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येत नाही. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचेही संकट उभे रहात आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नदीकाठच्या नगरपालिका, ग्रामपंचायतींना काही मार्गदर्शक सुचना केल्या आहेत.
 
सावित्रीनदी सांडपाण्याने प्रदुषीत
 
महाड तालुक्यातून वाहणार्‍या नदीमध्ये महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमधील सांडपाणी सावित्रीमध्ये सोडले जाते. या पाण्यामध्ये जीवजंतुचे प्रमाण जास्त असल्याने या पाण्यातील (बीओडी) बायोकेमिकल ऑक्सिजन डीमांडची पातळी 50.0 मीलीग्रॅम इतकी वाढली आहे.
 
कुंडलिका नदीने नावलौकीक गमावला
 
कुंडलिका नदी अलिबाग तालुक्याची तहाण या एमआयडीसीच्या पाण्यावर भागते. रोहा शहरापर्यंत ही अमृतगंगा असणारी ही नदी त्यापुढे वाहत जाताना गटारगंगा होत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करतात. रोहा शहरातून सोडल्या जाणार्‍या सांडपाण्यामुळे येथील पाण्यातील बीओडी पातळी वाढत चालली आहे.
 
खोपोलीतील सांडपाणी पाताळगंगेत
 
खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्वच पाणी पाताळगंगेत सोडला त्याचबरोबर खोपोलीच्या हद्दीतील कंपन्यांमधूनही पाणी नदीत सोडण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे नदीतील पाण्याची बीओडी पातळी 11.0 पर्यंत वाढली आहे.
 
अंबा नदीला औद्योगिकरणाचा फटका
 
या नदीच्या किनार्‍यावर नागोठणे गाव सोडल्यास इतर मोठे गाव नाही, तरीही प्रदुषण पातळी मर्यादेपेक्षा जास्त आहे. यामुळे हे पाणी पिण्यासाठी घातक ठरत आहे. या नदीतील मासेमारीही संकटात आली आहे.
 
उल्हास नदीचे वाढते प्रदुषण
 
उल्हास आणि तिच्या जोड नद्यांवर येथील अनेक पाणीपुरवठा योजणा सुरु आहेत. मात्र, वाढत्या नागरिकरणामुळे ही नदी दूषित होत आहे. बायोकेमिकल ऑक्सिजनची किमान पातळी या नदीच्या पाण्याने पार केली असल्याचे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आहवालातून स्पष्ट होत आहे.