अलिबाग येथील हत्येची उकलः चुलत भावानेच केली नथुराम रुपसिंगची हत्या; एकजण अटकेत

20 Mar 2023 16:27:41
Alibag Shipai Kamgar Murder 
 
अलिबाग । अलिबाग परिसरातील एका सफाई कामगाराच्या हत्या प्रकरणात एकाला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. 1 लाख रुपयांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
अलिबाग येथील युनियन बँकेसह अनेक इमारतींमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणारा नथुराम रुपसिंग याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह पालव स्मशानभूमी येथे आढळून आला होता. यानंतर खळबळ उडाली होती.
 
या हत्येचा तपास अलिबाग पोलीस करत असताना अनेक आर्थिक घडामोडी समोर आल्या. नथूराम याने निलेश पवार या नातेवाईकाला बँकेत नोकरी लावण्यासाठी त्याच्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. त्याप्रमाणे कामदेखील मिळवून दिले. निलेश सफाई कामगार म्हणून बँकेत काम करु लागला. त्याला नथूराम 6 हजार रुपये पगार देत असे.
 
मात्र बँकेने नाही तर नथुरामने त्याच्या जागी निलेश साफसफाईचे काम करणार असल्याचे बँकेला सांगून ठेवले होते. ही बाब महिन्यानंतर निलेश याला समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याला कळून चुकले होते. त्यामुळे त्याने पैसे परत मागण्यास सुरुवात केली.
 
 याच पैशाच्या वादातून नथुराम याची पालव स्मशानभूमीजवळ नेऊन हत्या करण्यात आली. हत्येनंतर निलेश हा त्याच्या नातेवाईकांसोबत खोटा खोटा शोक व्यक्त करत होता. शेवटी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत, त्याने नथुरामची हत्या केल्याचे कबूल केले. त्याच्या आणखी एक नातेवाईक साथीदाराचा शोध सुरु आहे.
 
निलेश याला अलिबाग न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीआय जाधव, सुनील फड, अनिकेत म्हात्रे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0