रायगड जिल्हातील सहाआसनी रिक्षा चालकांच्या आंदोलनाला यश ; मुख्यमंत्र्याकडील बैठकीत अनेक प्रश्न मार्गी

18 Mar 2023 17:47:58
Rikshya Chalak Bathak
 
अलिबाग | मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जिल्हयातील सहा आसनी रिक्षा चालकांच्या आंदोलनाला यश आले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अनेक समस्यांची निर्गती लागली असून अनेक मुद्यांवर सर्वमान्य तोडगा निघाला आहे. आ. महेंद्र दळवी आणि आ. भरत गोगावले यांनी यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
 
Riksha Chalak Andolan Magnyana Yash 2
 
जिल्हयातील सहाआसनी रिक्षाचालकांच्या प्रलंबित प्रश्नांवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. विजय पाटील यांनी दोनवेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्याचबरोबर पेण येथे शिवसेनेचे विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला. प्रत्येकवेळी आश्वासने देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. त्यामुळे अखेर 16 मार्च रोजी विजय पाटील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा देत शेकडो सहाआसनी रिक्षा चालकांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विजय पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला. त्याचवेळी शुक्रवारी (दि. 17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्रूा दालनात बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सचिवालयाने दिले.
 
त्यानुसार ही बैठक पार पडली. संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. प्रामुख्याने जिल्हयातील सहाआसनी रिक्षांची वयोमर्यादा सरसकट दोन वर्ष वाढवून देण्यास सहमती झाली. इको टॅक्सीला सीएनजी मान्यता मिळावी, व्यवसाय करातील चक्रवाढ व्याजातून सूट मिळावी, प्रत्येक टॅक्सी चालकाला 1500 रुपये कोरोना काळातील सानुग्रह अनुदान मिळावे, बदली वाहन करताना 25 हजार रुपये ऐवजी 10 हजार रुपये फी आकारण्यात यावी. तीन चाकी सहा आसनी सीएनजी वाहनास मान्यता मिळावी. नवीमुंबई परीवहन सेवेच्या कर्जत, खोपोली, रसायनी ,पनवेल ,येथे सुरु असलेल्या बसेसच्या फेर्‍या कमी करण्यात याव्यात, सर्व सहाआसनी रिक्षा स्टॅन्ड अधिकृत करण्यात यावेत अश्या अनेक विषयावर सकारात्मक चर्चा करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हा संघटनेच्या मागण्या रास्त असून लवकरात लवकर या मागण्या होण्यासंदर्भात आदेश दिले.
 
बैठकीला मंत्री दादा भुसे, प्रधान सचिव परिवहन, मुंबई प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अध्यक्ष, परिवहन आयुक्त,जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, उपयुक्त परिवहन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, रायगड जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, दिलीप भोईर संदेश धुवाली, कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, सुधाकर यादव, शेखर राखाडे, दिपक नावडेकर, दिपक म्हात्रे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0