व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली महिला वकीलाची पावणे दोन लाखांनी फसवणूक

By Raigad Times    04-Feb-2023
Total Views |
Visa Fraud
 
पनवेल | कॅनडा येथे उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पनवेल मधील एका महिला वकीलाला एका टोळीने व्हिजा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पावणे दोन लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी टोळी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहेफसवणूक झालेल्या 47 वर्षीय महिला वकील पनवेलच्या तक्का भागात राहण्यास असून त्यांना मे 2020 मध्ये कॅनडा येथे उच्च शिक्षणासाठी जायचे होते. मात्र, त्यांचे वय जास्त असल्याने त्यांना स्टुडंट व्हिजा मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन इमिग्रेशन कन्सलटन्ट सर्च केले होते. त्यावेळी ऍक्मे इंटरनॅशनल कंपनीतून सरफराज नावाच्या व्यक्तीने या महिला वकीलाला संपर्क साधला होता. तसेच त्याने स्टुडंट व्हिजा ऐवजी वर्क परमिटवर परदेशात जाण्यास सांगून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली होती. त्यानंतर सदर कंपनीचा डायरेक्टर कांतीलाल शहा याने बर्क परमिटवर परदेशात जाण्यासाठी कराव्या लागणार्‍या प्रक्रियेची माहिती ई- मेलद्वारे दिली होती. त्यानंतर जून 2020 मध्ये शहा याने महिला वकीलाला कॅनडा येथे असिस्टंट लिगल काउन्सील ऍडमिन जॉब उपलब्ध असल्याबाबतचा ई-मेल पाठविला.
 
सदर जॉबसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जून 2020 असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यासाठी महिला वकीलाने तयारी दर्शविल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशनसाठी 41 हजार 300 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महिला वकीलाने सदर रक्कम भरून सर्व कागदपत्रे स्कॅन करुन पाठवून दिले. त्यानंतर त्यांनी व्हेरीफिकेशनचे 1 लाख 35 हजार रुपये देखील भरले. मात्र, त्यांचे लॉगिन होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्याबाबत त्यांनी चौकशी केली असता कोव्हीड- 19 मुळे त्यांचे लॉगिन होत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर कंपनीकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मालाड येथील ऍक्मे कंपनीत जाऊन चौकशी केली असता, त्यांचे काम प्रोसेसमध्ये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर देखील त्यांच्या व्हिजाचे काम केले नाही. त्यामुळे महिला कलाने नोव्हेंबर महिन्यात पुन्हा मालाड येथील कार्यालय गाठले. मात्र तेथील कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.