डिलेव्हरी बॉय कडूनच कंपनीमध्ये चोरी; 7 लाख 62 हजार रुपयांचा घातला गंडा

By Raigad Times    03-Feb-2023
Total Views |
thief
 
पनवेल | ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणार्‍या डिलिव्हरी बॉयनेच 22 महागड्या मोबाईलची चोरी करून कंपनीला तब्बल 7 लाख 62 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कलिमखान बाबुखान पठाण (34) असे डिलिव्हरी बॉयचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या घरातून पाच मोबाइल फोन हस्तगत केले आहेत.
कलिमखान पठाण हा सीबीडी बेलापूर येथील शहाबाज गावात राहण्यास असून तो खारघरमधील एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. कंपनीच्या कार्यालयातून डिलिव्हरीसाठी नेलेल्या वस्तू तसेच परत आणून जमा केलेल्या वस्तू व जमा केलेले पैसे याची नोंद खारघरमधील शाखेमध्ये केली जाते. गत सप्टेंबरमध्ये कंपनीच्या वतीने व्यवहाराची तपासणी करण्यात आली असता, खारघर शाखेमधील मोबाईल फोनची संख्या व हिशेबाचा मेळ बसत नसल्याचे कंपनीतील अधिकार्‍याच्या लक्षात आले.
 
मोबाईलची डिलिव्हरी होत नसलेल्या विभागाची माहिती काढली असता, डिलिव्हरी बॉय कलिमखान पठाण याच्यावर संशय आला. त्यामुळे कंपनीने त्याच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवली. त्यानंतर कलिमखान हाच कंपनीतील मोबाईलची चोरी करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बुधवारी तो खारघर येथील कंपनीच्या कार्यालयात आला असताना त्याच्याकडे विचारपूस केली असता मात्र सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्याला कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता, त्याने दोन मोबाईलची चोरी केल्याचे कबूल केले. तसेच दोन मोबाइल घरी ठेवल्याचे सांगितले. मात्र त्याच्या घरात पाच मोबाईल सापडले. त्यानंतर कंपनीने आपल्या सिस्टीमची तपासणी केली असता गत पाच महिन्यात एकूण 22 मोबाईलची चोरी झाल्याचे आढळून आले. कलिमखानने मोबाईलची चोरी करुन ग्राहकांना विकल्याचे कबूल केले.