रायगड : वृद्धेच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; पोलीस कोठडीत रवानगी

23 Feb 2023 18:34:59
Senior Citizen Murder
 
माणगावातील म्हसेवाडी येथील घटना
 
माणगाव । माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथे वृद्ध महिलेला लुटून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली होती. या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे तिघेही मारेकरी हे गावातीलच आहेत.
 
मंगळवारी (21 फेब्रुवारी) म्हसेवाडी येथील संगीता श्रीरंग सावंत (वय 69) या महिलेला लुटून राहत्या घरातच तिची हत्या करण्यात आली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने माणगावात खळबळ उडाली होती. संगीता सावंत या घरात एकट्या असल्याचे पाहून लुटारुंनी घरात प्रवेश केला आणि घरातील मोरीत पाण्याने भरलेल्या टपात बुडवून त्यांची हत्या केली होती.
 
मारेकर्‍यांनी त्यांच्या कानातील सोन्याच्या कुडी हाताने जबरदस्तीने खेचून, कानाच्या पाळी फाडून त्यांना रक्तबंबाळ केले. नंतर गळ्यातील सोन्याची माळ व हातातील सोन्याच्या चार बांगड्या चोरून 3 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता.
 
या हत्येप्रकरणी माणगाव पोलिसांनी बुधवारी (22 फेब्रुवारी) गावातच राहणार्‍या सुभाष दळवी (वय 50), प्रशांत कदम (वय 55), राजेश सावंत (वय 58) या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांनीच हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
 
आज (23 फेब्रुवारी) माणगाव न्यायालयासमोर या तिघांना हजर केले असताना, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0