कर्जत । मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे कधीही आम्ही म्हणालो नाही. त्यांना आरक्षण द्याच, परंतू ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये इतकेच आपले म्हणणेे आहे. या भुमिकेपासून आपण कधीही मागे हटणार नाही, सरकारने राजीनामा देण्यास सांगितला तर एका मिनिटात राजीनामा देवून बाजूला होईन अशी स्पष्ट भुमिका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
कर्जत येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय वैचारिक शिबिरात छगन भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पक्ष संघटना वाढविण्यासाठी नेत्यांनी वेळ दिला पाहिजे असे मुद्दे मांडले. मात्र त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ कमालीचे आक्रमक दिसले.
मराठा समाजाने मोर्चे काढले, आंदोलने केली मात्र मी त्यात ओबीसी समाजाचा नेता म्हणून कुठेही नव्हतो. मात्र त्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे म्हणून आग्रह धरल्यावर आणि बीड मधील घटनेनंतर ओबीसी आंदोलनात उतरलो असे सांगितले. त्याआधी आपण ओबीसी म्हणून देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर लांब होतो, त्यामुळे कोणीही मला त्यात ओढू नये आणि मला आपले हक्क टिकवून ठेवण्यासाठी रोखू शकत नाही.
नेता म्हणून ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला समविष्ट करू नये या भूमिकेवर मी ठाम आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यांना ते आरक्षण स्वतंत्र मिळावे हीच भूमिका मी मांडत आहे. सरकार विरोधी भूमिका घेतो म्हणून राजीनामा देण्यास सांगितले तर एका मिनिटात राजीनामा देवून बाजूला होईल असे देखील जाहीर छगन भुजबळ यांनी जाहीर केले.
आम्ही केंद्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचे बिल आणावे यासाठी सरकार म्हणून प्रयत्नशील आहोत अशी माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. तर काल आल्यापासून कर्जत तालुक्यात तुमच्या विरुद्ध आंदोलने सुरू आहेत या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी त्यांना काय करायचे ते करू द्या, अशी आंदोलने आम्ही भरपूर अनुभवली आहेत असे सांगून ते पत्रकार परिषद आटपून मुंबईचे दिशेने रवाना झाले.