अलिबाग : मांडवा जेट्टीजवळ उभ्या असलेल्या स्पीड बोटीला अचानक आग लागली. या दुर्घटनेत २ जण किरकोळ जखमी झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
ही घटना आज (2 डिसेंबर) दुपारी सव्वाबारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. "बेलवेडर" नामक या स्पीड बोटीमध्ये एसीसाठी असलेल्या जनरेटच्या जंक्शनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे जेट्टीवर काहीकाळ गोंधळ उडाला होता. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने आग नियंत्रणात आणल्याची माहिती मांडवा येथील बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी दिली. दरम्यान, ही स्पीड बोट जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.