अजित पवार हेच महाराष्ट्रातील विश्वासार्ह नेते - सुनिल तटकरे

By Raigad Times    02-Dec-2023
Total Views |
karjat
 
कर्जत । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पाठीशी 80 टक्के पक्षाचे लोकप्रतिनिधी असून तेच राज्यातील सर्वात जास्त विश्वासार्ह नेते आहेत प्रतिपादन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. दादांच्या भूमिकेने नवीन पर्वाला सुरुवात झाली असून आता घड्याळ तेच पण वेळ नवी या घोषवाक्य घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पुढील वाटचाल करील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
 
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय वैचारिक शिबिर कर्जत येथील रेडीसन हॉटेल येथे सुरू झाले. 30 नोव्हेंबर आणि एक डिसेंबर या कालावधीत हे शिबिर होत असून शिबिराची सुरुवात ध्वजारोहण करून झाली.राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हस्ते रेडीसन हॉटेलचे प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकाविण्यात आला.
 
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल,प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे,महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर,राज्य सरकार मधील मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,अनिल पाटील,डॉ राजेंद्र शिंगणे,अदिती तटकरे आदीसह पक्षाचे सर्व सेल चे प्रमुख यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शिबिराची सुरुवात खासदार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाषणाने झाली. साधारण 50 मिनिटे सुनील तटकरे यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
 
मराठा आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे, मात्र आरक्षण देताना सरकारकडून मराठा आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे तसेच ते कायद्याच्या कसोटी मधील असावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्यावेळी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आणि त्यांच्या अन्याय न करता आरक्षण दिले जावे यासाठी आमचा आग्रह असल्याचे ते म्हणाले.