रत्नागिरी । काही लोक प्रकल्पाला विरोध करत असतात मात्र कोकणचा विकास झाला तर इथल्या तरुणांना-तरुणींना कामासाठी कुटुंब सोडून मुंबई-ठाण्यात जावे लागणार नाही. त्यामुळे आम्ही कोकणच्या विकासाला प्राधान्य देत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते रत्नागिरी येथे बोलत होते.
कोका-कोला रत्नागिरीत 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. कंपनीच्या पहिल्या टप्प्याचं गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना, गरज पडली तर कोेकणात कॅबिनेटची बैठक घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.
कोकणच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प येतात तेव्हा त्याला विरोध केला जातो. काही लोक केवळ विरोध करण्याचं काम करतात, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली. कारण नाणार आणि बारसू या प्रकल्पांना ठाकरे गटाने विरोध केला होता.
मुख्यमंत्री म्हणाले, कोका-कोला कंपनी रत्नागिरीत कार्यान्वित होत आहे. आमच्याकडून कोकणी माणसाची फसगत होणार नाही. सरकार कोकणी माणसाचा विश्वासघात करणार नाही. कोकणात कॅबिनेट बैठकीची आवश्यकता असेल तर तेही होईल. आमच्या कॅबिनेटने आतापर्यंत प्रत्येक बैठकीत कोकणच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
राज्य सरकार केवळ कोकणी माणसाला वापरून घेणार नाही. या कोकणी माणसाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर, शिवसेनेवर प्रेम केलं. परंतु, त्यांना काय मिळालं? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात दोन ते तीन हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार प्राधान्याने कोकणचा विकास करणार आहे.