अलिबाग । बँक ऑफ बडोदाच्या कृषी पंधरवडयानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई विभागाच्या शेतकरी संपर्क अभियाना अंतर्गत अलिबाग येथे झालेल्या मेळाव्यात शेतकरी, महिला बचत गट, मत्स्य व्यावसायिक यांना 10 कोटी रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या मेळाव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे आयोजीत कार्यक्रमास बँकेच्या ग्रामीण व कृषी विभागाचे महाव्यवस्थापक नित्यानंद बेहरा, नवी मुंबई क्षेत्रीय प्रबंधक श्रीनिवास रविपती, उपक्षेत्रीय प्रबंधक हेमंत कुमार लाल, अलिबागच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, बॅकेच्या क्षेत्रीय व्यवसाय विकास प्रबंधक सिल्क स्मिता, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय कुलकर्णी, नाबार्डचे प्रदीप अपसुंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एल. हरळया कृषी उपसंचालक बोरांडे, बँकेच्या नवी मुंबई रीजनचे वित्तीय समावेशन अधिकारी अभय डोंगरे, अलिबाग शाखा प्रबंधक चैतन्य मूड आदि उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना नित्यानंद बेहरा यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले. महिला बचत गटांचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. ही योजना यशस्वी झाल्याचे सिदध झाले आहे. महिलांनी एकत्र येत अधिकाधिक बचतगट स्थापन करावेत. या बचत गटांना मिळणारया कर्जातून व्यवसाय करत स्वतःच्या आणि देशाच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
बँका आणि ग्राहक यांच्यात सुसंवद असला पाहिजे. बँक मित्राच्या माध्यमातून ग्राहकांना ग्रामीण भागात बँकेच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या कार्यक्रमात विविध विभागाच्या अधिकारयांनी आपल्या वि भागातर्फे राबवल्या जाणारया योजनांची माहिती दिली. अटल पेन्शन योजना, जनधन योजना, जीवन सुरक्षा, जीवन ज्योती, सोनेतारण, मत्स्यसंपदा तसेच कृषी पायाभूत सुविधा यासाठीच्या कर्ज योजना, महिला बचत गटांसाठी राबवल्या जाणारया योजना यांच्या माध्यमातून स्वतःबरोबरच देशाची प्रगती साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला बँक ऑफ बडोदाच्या किसान रथला नित्यानंद बेहरा यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. हा रथ गावोगावी फिरून केंद्र सरकारच्या तसेच बँकेच्या विविध योजनांची माहिती चित्रफीतीव्दारे देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.