...अन्यथा तेव्हाच आमचे सरकार स्थापन झाले असते

01 Dec 2023 16:26:36
karjat
 
कर्जत । 2017 साली मला आणि अजित पवार यांना सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. पण, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. काही कारणास्तव ते सरकार स्थापन झालं नाही. नाहीतर 2017 सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते, असं विधान रायगडचे खासदार सुनील तटकरेंनी केले आहे. ते कर्जतमधील अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.
 
सुनील तटकरे म्हणाले, सात-आठ महिने चर्चा झाल्या, लोकसभेच्या जागा, खाती, मंत्रीपदे, पालकमंत्रीपदेही ठरली होती. पण, काही कारणास्तव ते सरकार बनलं नाही. सरकार स्थापन झालं नाही, म्हणून कर्जतमध्येच पक्षाचं शिबीर पार पडले होते आणि तिथून नवीन दिशा घेऊन आपण कामाला लागलो. आता, त्याच कर्जतमध्ये आपलं शिबीर आहे. ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ या विचारांनी आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे, असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.
 
2019 साली पहाटेचा नाहीतर सकाळी 8 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. पण, तेव्हा अजित पवारांच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचं निवेदन तयार करण्यात आलं होतं. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ठाण्यातील आमदाराचींही सही होती, असे म्हणत सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं.
Powered By Sangraha 9.0